मुक्तपीठ टीम
राजकीय हाडवैरी असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शिवसेना पक्षप्रमुखक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ मिळाली आहे. आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाकपने पाठिंबा जाहीर केला आहे. भाकप नेत्यांनी दुपारी अडीचच्या सुमारास ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला सक्रिय पाठिंबा दिला. आता जरी भाकप शिवसेना एकत्र आले असले, तरीही मुळात शिवसेनेच्या स्थापनेपासून आजवर शिवसेना आणि भाकप यांचा इतिहास हा वैराचाच राहिला आहे. त्यातही सुरुवातीच्या काळात तर तो रक्तरंजितही होता.
कम्युनिस्ट आणि शिवसेनेतील रक्तरंजित संघर्ष!
- पूर्वी मुंबईच्या लालबाग, परळसारख्या भागात लाल बावट्याचे वर्चस्व होते.
- आपल्या विचारांच्या, पक्षाच्या विरोधातील कुणालाही त्या भागात उभे राहू दिले जात नसे.
- डाव्या पक्षांची एकेकाळी गिरणगावात एकतर्फी हुकूमत होती.
- ती कमी करण्यासाठी शिवसेनेने अतिशय आक्रमक भूमिका घेतली.
- डावे आणि शिवसैनिक यांच्यात अनेकदा हाणामार्या होत असत.
- अशा हाणामाऱ्यांमध्ये दोन्ही बाजूंचे रक्त सांडत असे आणि काहीवेळा तर थेट खूनापर्यंतचा टोकाचा संघर्ष होत असे.
- गिरणगावातील कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांचाही मोठा दबदबा होता.
- त्यांच्यावरही अनेकांवरील हल्ले, हत्त्या यांच्यात सामील असल्याचे आरोप केले जात.
- त्यांचा खून झाला. तसेच परळ येथील दळवी बिल्डिंगमधील भाकपच्या कार्यालयावरील हल्ला झाला.
- त्यानंतर गिरणगावातील डाव्यांचा प्रभाव ओसरला.
- देसाईंच्या हत्येमागे शिवसेना असल्याचा आरोप कम्युनिस्ट नेत्यांनी केला होता, पण न्यायालयात तो टिकला नाही.
- देसाईंच्या हत्येनंतर त्या मतदारसंघामधून शिवेसनेचे आमदार वामणराव महाडिकांना स्थानिक मतदारांनी निवडून दिले.
- लालबाग ते दादर चाळींवर लाल बावट्याच्या जागी भगवा फडकू लागला.
- अर्थात भाकपशी शत्रूत्व असलं तरी सर्व डावे शिवसेनेचे, ठाकरेंचे शत्रू होते, असं नाही, कॉम्रेड डांगेंसारख्यांशी सख्यही होते.
समान शत्रू भाजपामुळे कम्युनिस्ट शिवसेनेसोबत!
कगेली पाच दशके शिवसेना हा मुख्य शत्रू मानणाऱ्या भाकपने आता देशातील मुख्य शत्रू भाजपा असून, शिवसेना त्याच्याविरोधात उभी ठाकल्यामुळे त्यांना साथ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच अंधेरीच्या पोटनिवडणुकीत आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी या प्रमाणेच कम्युनिस्टांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
भाकपचा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय!!
- भाजपाविरोधात लढण्यासाठी भाकप आणि शिवसेना एकत्र निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
- ‘राजकारणात परिस्थितीनुरूप भूमिका घ्यावी लागते.
- सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील संदर्भ बदलले आहेत.
- केंद्रातील सत्ताधारी भाजपचा कारभार हा हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे.
- पुन्हा मनुवाद आणण्याची कृती, संसदीय कामकाजातील एकाधिकारशाहीचा वाढता प्रभाव, विविध संवैधानिक स्वायत्त संस्थांमध्ये गैरवाजवी हस्तक्षेप, प्रादेशिक पक्षांचे उच्चाटन करण्याचे भाजपचे मनसुबे, यामुळेच जाणीवपूर्वक पक्षाने शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे’, असे भाकपच्या राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.