मुक्तपीठ टीम
भारतातील लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाची लस शोधण्यात ऑक्सफर्डसोबत सहभागी असणाऱ्या अॅस्ट्रॅजेनेका कंपनीच्या तज्ज्ञांना हे वाढवलेले अंतर गैर वाटत नाही. त्यांच्या मते, “लसीकरणानंतर दुसर्या आणि तिसर्या महिन्यांत एकाच डोसमुळे मिळालेली रोग प्रतिकारक्षमता अधिक लक्षणीय वाढते.”
ऑक्सफोर्डचे तज्ज्ञ अँड्र्यू पोलार्ड काय म्हणतात?
• दोन देशांमधील भिन्न परिस्थितीमुळे ब्रिटन आणि भारतातील लसीकरण धोरणाची तुलना केली जाऊ नये.
• लसीकरण धोरणाचे उद्दीष्ट हे आहे की भारतातील सद्य परिस्थितीत जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जास्तीत जास्त लोकांना लसीचा एक तरी डोस दिला गेला पाहिजे.
• लसीचा सर्वत्र तुटवडा निर्माण झालेला असताना, लसींचे दोन्ही डोस देऊन अधिक चांगल्या दर्जाचे संरक्षण देण्याऐवजी जास्तीत जास्त लोकांसाठी सुरक्षितता उपाय पुरवणे योग्य आहे.
ब्रिटनने का कमी केले दोन डोसमधील अंतर?
• भारतात कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवले जात असतानाच ब्रिटनमध्ये कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी केले गेले होते.
• ब्रिटनने या कोरोना काळात लसींमधील अंतर कमी केले, कारण त्यांच्या लोकसंख्येतील एका मोठ्या भागाचे लसीकरण झाले आहे.
“कुठे अंतर कमी, कुठे अंतर जास्त’ अर्थ काय?
• लसी पुरेशा उपलब्ध नसताना किमान एक डोस जास्तीत जास्त लोकांना देऊन संरक्षणाची एक पातळी तयार करणे आवश्यक मानले जात आहे.
• दोन डोस दिले तर अधिक चांगल्या दर्जाचे संरक्षण पुरवणारे ठरेल.
• परंतु लसी पुरेशा नसतील तर अंतर वाढवून किमान काही तरी संरक्षण जास्तीत जास्त लोकांना देणे योग्य मानले जात आहे.