मुक्तपीठ टीम
कोविशिल्ड कोरोना लसीचे १० हजार डोस गायब झाले आहेत. पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटकडून १ हजार वायल जबलपूरच्या मॅक्स हेल्थ केअर रुग्णालयाच्या नावाने विकत घेतले गेले होते. दिल्लीहून जेव्हा लस वितारणाची यादी मिळाली तेव्हा स्थानिक यंत्रणेनं तपासलं. तेव्हा त्या नावाचे रुग्णालयच अस्तित्वात नसल्याचे उघड झाले. दहा हजार डोस म्हणजे एक हजार लसीच्या वाइल्स, त्यांची किंमत साठ लाख आहे. ती अदा करून या लसी विकत घेतल्या गेल्याने त्या गेल्या तरी कुठे असा प्रश्न पडला आहे. लस टंचाईच्या काळात, अशा प्रकारे लस विकत घेऊन दामदुप्पट दराने विकण्याचे एखादे रॅकेट आहे का, असाही संशय व्यक्त केला जात आहे.
नसलेल्या रुग्णालयाला कोरोना लस पुरवठा
• मध्यप्रदेशातील जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नावाचं कोणतंही रुग्णालय जबलपूरमध्ये नसल्याचं सागितलं गेलं आहे.
• २ दिवसांपासून याचा तपास केला असता ही बाब समोर आली आहे.
• मध्य प्रदेशमधल्या काही खासगी रुग्णालयांनी सीरम इन्स्टिट्यूटकडून थेट कोविशिल्ड लसी विकत घेतल्या आहेत.
• यात जबलपूर, भोपाळ आणि ग्वालियरचे प्रत्येकी एक आणि इंदोरमधल्या ३ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.
• त्यांनी एकूण ४३ हजार डोस विकत घेतले आहेत.
• एका वायलमध्ये १० डोस असतात.
• जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर शत्रुघ्न दाहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरण ऍपवर २ दिवसांपूर्वी त्यांना एक मेसेज आला. त्यात जबलपूरच्या मॅक्स हेल्थ केअर इन्स्टिट्यूटला १० हजार डोस पुरवल्याची माहिती आहे. दोन दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून या रुग्णालयाचा तपास केला गेला.
• मात्र रेकॉर्डवर असं कुठलंही रुग्णालय अस्तित्वात नसल्याची माहिती मिळाली.
लसींचा दुरुपयोग टाळण्यासाठी अलर्ट
• लसींचा दुरुपयोग होऊ नये, यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
• सीरम इन्स्टिट्यूटकडून या रुग्णालयाची अधिकची माहिती मागवण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांना सीरमने ६०० रुपये प्रति डोसच्या दराने लसी दिल्या आहे.
• त्यामुळे १० हजार डोसची किमत ६० लाखांच्या घरात जाते.
केंद्र आणि सीरममध्ये काय आहे करार?
• सीरम इन्स्टिट्यूट आणि केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारांना ४०० रुपये, खासगी रुग्णालयांना ६०० रुपये आणि केंद्राला १५० रुपये प्रति डोसने विक्रीचा करार झाला आहे.
• ७ जून रोजी पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेनुसार आता केंद्र ७५ टक्के लसी स्वतः विकत घेणार आहे.
• २५ टक्के लसी खासगी रुग्णालयं खरेदी करु शकतात.
• तसंच खासगी रुग्णालयं फक्त १५० रुपये सर्विस चार्ज आकारु शकतात.