मुक्तपीठ टीम
कोरोनाचा प्रभाव मुंबईत काहीसा कमी झाल्याने १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी रेल्वे सेवा सुरू केली आहे. मात्र, गेल्या दहा दिवसात रुग्ण संख्या वाढीचा वेग वाढू लागला आहे. कोरोना रुग्णसंख्येत चार हजाराहून जास्त वाढ झाली आहे. याची दखल घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी “जर कोरोना संख्या जास्त प्रमाणात वाढू लागली तर वेगळा विचार करावा लागेल”, असा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे दिवसभर रेल्वे प्रवासाची मुंबईकरांची मागणी तूर्तास पूर्ण होणे अवघड असल्याचे दिसत आहे.
देश अद्याप कोरोनाचा विळख्यातून सुटलेला नाही. मात्र, नागरिकांच्या रोजी-रोटीचा विचार करून सरकारने १ फेब्रुवारपासून निर्धारित वेळेत सर्वांसाठी रेल्वे सेवा सुरू केली. मात्र त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात रुग्णसंख्या दुपटीचा दर हा ५६४ दिवसांवर होता तो आता ५५५ वर पोहचला आहे. याचा अर्थ कोरोना संसर्ग पुन्हा काहीसा वाढू लागला आहे.
“रुग्णसंख्येत झालेली वाढ ही तशी जास्त चिंताजनक नाही. मात्र अशीच वाढ महामुंबई परिसरात पुढील दहा ते बारा दिवस होत राहिल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल”, असा इशारा मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिला आहे.
कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढती
१ फेब्रुवारी ३२८ रुग्ण
२ फेब्रुवारीला ३३४ रग्ण
३ फेब्रुवारीला ५०३ रुग्ण
४ फेब्रुवारीला ४६३ रुग्ण
५ फेब्रुवारीला ४१५ रुग्ण
६ फेब्रुवारीला ४१४ रुग्ण
७ फेब्रुवारीला ४४८ रुग्ण
८ फेब्रुवारीला ३९९ रुग्ण
९ फेब्रुवारीला ३७५ रुग्ण
१० फेब्रुवारीला ५५८ रुग्ण