मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासंबंधीत बुधवारी एक मोठी घोषणा केली. यामध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. यासोबतच इतर व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास १ मार्चपासून सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी सांगितले आहे.
या नियमात बदल
केंद्र सरकारनेही या टप्प्यातील लसीकरणाच्या नियमांमध्ये बदल केला आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकाही लसीकरणाचा भाग होते. परंतु आता ते ६० वर्ष करण्यात आले आहे.
खाजगी रुग्णालयात लसीसाठी मोजावे लागणार पैसे
- मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केले की, सरकारने सुमारे २० हजार खाजगी रुग्णालये निवडली आहेत, जिथे कोरोना लसीकरण केले जाईल.
- मात्र, या रुग्णालयातून लसीकरणासाठी पैसे मोजावे लागतील. पण शासकीय लसीकरणाच्या केंद्रांमध्ये कोरोनाची लस विनामूल्य दिली जाईल.
- खाजगी रुग्णालयांमधील लसीची किंमतही काही दिवसांत केंद्र सरकार ठरवेल.
- प्रकाश जावडेकर यांनी हे देखील स्पष्ट केले की एकदा या लसीची किंमत निश्चित झाली की मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीही पैसे देऊन लसीकरण करुन घेतील.
लस निवडण्यासाठी पर्याय नाही
- लसीकरणाच्या सुरुवातीला ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा डेटा को-विन अॅपला जोडला जाईल.
- ४५ ते ५० वयोगटातील नागरिकांच्या संख्येपेक्षा ६० वयोगटातील संख्या कमी आहे.
- खाजगी रुग्णालयांमध्येही कोव्हीशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसी देण्यात येतील.
- परंतु, लसीचा लाभ घेणारे स्वत: लस निवडू शकतात की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.