मुक्तपीठ टीम
देशातील कोरोना लसीकरणा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आता ४५ पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लस मिळणार आहे. केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पात्र असलेल्यांनी आपली नोंदणी करावी, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली. देशात कोरोना लसीची कमतरता नाही. लस घेण्यासाठी फक्त नोंदणी करावी लागेल. त्यांना सरकारी किंवा खासगी केंद्रांवर लस दिली जाईल, असे ते म्हणाले.
जावडेकर पुढे म्हणाले की, आतापर्यंत देशात ४ कोटी ८५ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. यातील ८० लाख लोकांना दोन्ही डोस दिले आहेत. मागील २४ तासात सर्वाधिक ३२ लाख ५४ हजार डोस देण्यात आले आहेत.
कोरोनाने आता देशभरच पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं बोलंलं जात आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग असून सर्वांचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.