मुक्तपीठ टीम
मुंबईतील एका एथिकल हॅकरने लसीसाठी ऑनलाईन स्लॉट बुक करणारी साइट हॅक केली असल्याची तक्रार मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये करण्यात आली आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रासह देशभरात लस टंचाई जाणवत असतानाच लसीकरणाचे स्लॉट नोंदणी सुरु होताच झटकन ऑनलाइन भरले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. हे नेमकं कसं घडतं, यावर चर्चा सुरु असतानाच आता हॅकिंगचा आरोप पुढे आला आहे.
मुंबईतील या हॅकरला
साइट उघडण्यापूर्वीच रिकाम्या स्लॉटची माहिती मिळते. टेलीग्राम आणि व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे ही माहिती मिळते. हा दावा सायबर कायदा तज्ज्ञ आयुष तिवारी यांनी केल्याची बातमी आहे. या हॅकरबद्दल संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणेला दिल्याचाही दावा करण्यात आला आहे.
कोविन ट्रॅकर ग्रुपशी संबंधित हे आठ तरुण आहेत. तरुणांनी सांगितले की या गटातील सामान्य लोकांच्याआधी त्यांना कळतं की,लस कधी येणार आहे आणि किती स्लॉट रिक्त आहेत. आयुष यांनी माहिती गोळा केली असता, तसे करणारा हॅकर हा मुंबईचा असल्याचे समजले. त्याने देशातील विविध शहरात ग्रुप तयार केले आहेत.
लसीकरण स्लॉटवर ऑनलाइन डल्ला कसा मारतात?
- हॅकरने कोविन पोर्टल वेब एपीआयचा वापर करून लिंक केले.
- यामुळे त्याला आधीच माहिती मिळते आणि तो स्लॉट बुक करतो.
- विशेष म्हणजे मध्यप्रदेशच्या इंदूरमधील लसीकरण अधिकारी डॉ. प्रवीण जाडिया यांनी शनिवारी डीआयजी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे साइट हॅक झाल्याची तक्रार दिली होती.
- आता सायबर कायदा तज्ज्ञांनी उघडपणे नावांनिशी तक्रार केल्याने लसीकरण सायबर स्लॉट चोरी नेमकी कशी होते ते उघड झाले आहे.
- महाराष्ट्रातही ग्रामीण भागातील लसींवर बाहेरच्या शहरांमधील शहरी नागरिक डल्ला मारत असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.
- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तर गुजरातसीमेवरील जिल्ह्यांमध्ये बाहेरील राज्यांमधून लोक येऊन लस घेत असल्याचा आरोपही केला होता.
- या प्रकरणी मुक्तपीठनं रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांच्या तक्रारीनंतर बातमीही दिली होती.