डॉ. फराह इंगळे
रशियन सरकारने पहिल्या लसीकरणानंतर ४५ दिवस मद्यपान न करण्याचा सल्ल्ला दिल्यामुळे अनेक लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे आणि ते मद्यपानाचा लसीकरणावर काही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो का, याबाबत विचार करत आहेत. पण, भारतामध्ये मान्यताकृत दोन लसींसह उपलब्ध छापील अहवालामध्ये मद्यपानाचा कोणताच उल्लेख नाही. यामुळे गोंधळामध्ये निश्चितच अधिक वाढ झाली आहे.
युके, रशिया व युएसमधील तज्ञांच्या मते मद्यपानामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि लसीकरणानंतर व्यक्तीमध्ये पुरेशा प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्याला प्रतिबंध होतो. मद्यपान व लसीकरणावरील संशोधन अहवालामधून निदर्शनास आले की, मद्यपानामुळे पोटामध्ये दाह निर्माण होऊ शकतो आणि मायक्रोबायोमच्या निर्मितीत बदल होऊ शकतो, संभाव्यत: रोगप्रतिकार शक्ती आरोग्यदायी ठेवणा-या सूक्ष्मजीवांचे नुकसान होऊ शकते. अधिक प्रमाणात मद्यपान केल्याने इतर आरोग्यविषयक आजारांचा देखील धोका निर्माण होतो, ज्यामध्ये हृदयविषयक आजार, कर्करोग व यकृतसंबंधित आजार यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींमधून दिसून येते की, लसीकरण होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर आरोग्यदायी सवयी राखणे आवश्यक आहे.
लसीकरणाला प्रतिसाद म्हणून आरोग्यदायी जीवनशैली राखण्यासाठी आणि उत्तम रोगप्रतिकार शक्ती असण्यासाठी करता येऊ शकणा-या गोष्टी पुढीलप्रमाणे:
- मद्यपान व धूम्रपान टाळा: मद्यपान, धूम्रपान किंवा इतर अनारोग्यकारक सवयी लसीच्या अधिकतम लाभासाठी टाळल्या पाहिजेत. लसीकरण झालेल्या लोकांनी आरोग्यदायी जीवनशैली असण्याची काळजी घेतली पाहिजे आणि लसीकरणाच्या वेळी मोठ्या प्रमाणात मद्यपान करणे टाळले पाहिजे.
- पुरेशी झोप घ्या: कोविड लसीकरणासाठी रोगप्रतिकार शक्ती उत्तम असण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घ्या. बीहेवीअरल मेडिसीनच्या इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार दररात्री पाच तासांपेक्षा अधिक झोप न घेणा-यांमध्ये पुरेशी झोप घेणा-यांच्या तुलनेत लसीकरणाचा अर्धा प्रभाव दिसून आला. हेच कोविड लसीकरणाच्या बाबतीत देखील लागू असेल.
- नियमित व्यायाम करा: सक्रिय राहणे व व्यायाम करणे हा शरीर आरोग्यदायी ठेवण्याचा आणखी एक मार्ग आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त आणि आरोग्यदायी वजन राखल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या विकृ्ती होण्यास कारणीभूत ठरू शकणा-या गंभीर आजारांचा धोका कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते.
- योग्य सेवन, आरोग्यदायी सेवन: कोणत्याही खाद्यपदार्थांमधून रोगप्रतिकार शक्तीला त्वरित चालना मिळत नाही. योग्य आहाराच्या सेवनामुळे आरोग्यदायी रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यामध्ये मदत होऊ शकते. विशिष्ट खाद्यपदार्थ विशेषत: प्रोबायोटिक्स तुम्हाला आरोग्यदायी ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शरीराला उत्तम पोषण मिळण्यासाठी भाज्या, फळे, कडधान्ये, दही व किण्वन प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात सेवन करण्याची काळजी घ्या.
महत्त्वाची बाब अशी की, कोरोना लसीकरण या महामारीचा सामना करण्यासाठी आणि लोकांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्यदायी राहा आणि उत्तम राहा. अफवांचा तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ देऊ नका, शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(डॉ. फराह इंगळे या वाशी येथील फोर्टिसचे सहयोगी हॉस्पिटल – हिरानंदानी हॉस्पिटल येथील इंटर्नल मेडिसिनच्या संचालिका आहेत)