मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. तज्ज्ञांच्या मते, आता कोरोनाची तिसरी लाट आली तर ती लहानग्यांसाठी धोकादायक ठरु शकते. त्यामुळे वृद्धांसोबत लहान मुलांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं झालेलं आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार तुम्ही तुमच्या मुलांना कोरोना संक्रमणापासून दूर ठेवू शकता.
सहा वर्षांवरील मुलांना मास्क लावा
जागतिक आरोग्य संगटना आणि यूनिसेफने सांगितल्यानुसार कोरोनाचा धोका वाढत असलेल्या भागांमधील ६ ते ११ वर्षांपर्यंतच्या मुलांनी मास्क वापरणं आवश्यक आहे. तसंच २ वर्षांखालील मुलांना मास्क लावू नये. लहान मुलांना सोशल डिस्टंसिंगबद्दल माहिती द्यावी. त्यांना सतत हात धुण्याची सवय लावावी.
लहानग्यांमधली कोरोनाची लक्षणं काय आहेत?
– लहान मुलांना १-२ दिवस ताप येणं.
– शरिराच्या किंवा पायाच्या भागावर लाल चट्टे दिसणं
– चेहऱ्याचा रंग नीळा पडणं
– हातापायांना सूज येणं, उलटी, मळमळीचा त्रास होणं
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय कराल?
– निरोगी फुप्फुसासाठी फुगा फुगवण्यासारखा व्यायाम करुन घ्या.
– पिण्यासाठी कोमट पाण्याचाच वापर करा.
– तुमचं मूल थोडं मोठं असेल तर त्याच्याकडून श्वासोश्चश्वासाचा व्यायाम करुन घ्या.
– रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आंबट फळं खायला द्या.
– हळदीचं दूध प्यायला द्या.
– कोरोनापासून बचावासाठी मुलांना समजावून सांगा. त्यांना घाबरवू नका.
मोबाईल आणि तणावापासून दूर ठेवा
तणाव हा फक्त वयस्कर व्यक्तींनाच येत नाही तर तो लहान मुलंही याचे बळी पडतात. तणावाचा परिणाम शरीर आणि रोगप्रतिकारकशक्तीवर होतो. मुलं टिव्हीवर नेमकं काय पाहतायत, याकडे बारकाईने लक्ष द्या.
नवजात बाळांची सुरक्षा कशी कराल?
नवजात बाळांना जास्त लोकांच्या संपर्कात आणणं टाळलं पाहिजे. नवजात बाळाच्या आईनेही आपले हात सतत धुणं गरजेचं आहे. नवजात बाळाला दूध पाजतानाही आईने मास्क वापरला पाहिजे जेणेकरुन कोरोनाचे किटाणू नवजात बाळापर्यंत पोहोचू नयेत. स्तनाची स्वच्छताही फार महत्वाची आहे.
कोरोनाची प्राथिमक लक्षणं दिसल्यास काय कराल?
लक्षणं- गळ्यात खवखव होणं मात्र श्वास घ्यायला त्रास होत नाही. पचनाचा त्रास होणं.
उपचार – लहान मुलांना घरातच विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात. लहान मुलाला जर काही पहिल्यापासून आरोग्यविषयक त्रास असेल तर डॉक्टरांची मदत घ्या.
मध्यम प्रकारचं संक्रमण झाल्यास काय कराल?
लक्षणं- निमोनियाची लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करु नका. ऑक्सिजन पातळी ९० टक्क्यांच्याही खाली जाणं.
उपचार – मुलाला कोविड रुग्णालयात दाखल करा.
अतिगंभीर परिस्थिती झाल्यास काय कराल?
लक्षणं- निमोनियाचा त्रास वाढणं, थकवा आणि जास्त झोप येणं, ऑक्सिजन पातळी ९० टक्क्यांहून खाली जाणं.
उपचार – फुप्फुसाची तपासणी, छातीचा एक्सरे काढणं आवश्यक आहे. कोविड रुग्णालयात दाखल करणं. उपचार करताना डॉक्टरांच्या निगराणीखाली रेमडेसीवीरचा वापर झाला पाहिजे.