डॉ. राहुल घुले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. दररोज जवळपास लाखोंच्या संख्येने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मृत्यूची संख्याही वाढली आहे. त्यामुळे घाबरून लोक रुग्णालयांकडे धावत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. नाही मिळाला तर अधिकच घाबरत आहेत. पण घाबरू नका. कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कोणालाही असू शकतो. अशा परिस्थितीत जर कोरोना लक्षणांचा संशय आला किंवा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर भीती वाटणे स्वाभाविकच. पण घाबरू नका. शांत व्हा. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय करायचं ते समजून घ्या, सोप्या भाषेत…
जर तुम्हाला कोरोनासारखी लक्षणे आहेत, असा संशय आला तर काय कराल?
- सर्वप्रथम एक लक्षात ठेवा तुम्हाला संशय आला म्हणजे तसेच असे नाही.
- तुमच्या लक्षणांविषयी काहीही न वाढवता, तसेच काहीही न लपवता डॉक्टरांशी बोला.
- डॉक्टरांशी बोला. घाबरू नका, ते सांगतील तसे करा.
- डॉक्टरांनी सांगितले तर कोरोना चाचणी करुन घ्या.
- प्रत्येकाला कोरोना चाचणी करताना आयसोलेट म्हणजे वेगळं राहण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव चाचणी करत असाल तर त्यानंतर इतर लोकांपासून दूर राहा.
- जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर घाबरू नका, परंतु पुढे काय करावे आणि कसे करावे याबद्दल विचार करा.
- डॉक्टरांशी बोलूनच प्रत्येक पाऊल उचला
कोरोना चाचणीनंतर आणि गृह विलगीकरण कालावधीत काय कराल?
- आयसोलेशन म्हणजे विलगीकरण
- कोरोनाचा रिपोर्ट लगेच येताच, उर्वरित लोकांपासून वेगळे राहा.
- बहुतेक कोरोना रूग्णांपैकी ज्यांची स्थिती फारशी गंभीर नसते आणि ते घरी राहून बरे होऊ शकतात. मात्र, ते डॉक्टरांना ठरवू द्या.
- तुम्ही या कालावधीत एका वेगळ्या खोलीत राहा.
- शक्य असेल तिथे घराच्या एका स्वतंत्र खोलीत रहा आणि आपले स्नानगृह वेगळे ठेवा. घरातही प्रत्येक परिस्थितीत, इतर लोकांसह सहा फुटांचे अंतर ठेवा. जर विलगीकरणासाठी वेगळी खोली नसेल तर शक्यतो गृहविलगीकरणे टाळणे योग्य. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तो निर्णय घ्या.
- मास्क काढू नका. खोलीत आणखी बरेच लोक असल्यास मास्क घाला आणि त्यांनाही ते घालण्यास सांगा.
- तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, मास्क घालू नका, परंतु त्यावेळी इतर लोकांना खोलीत येऊ देऊ नका.
- उपचार किंवा विलगीकरण दरम्यान फळांचा रस आणि नारळाचे पाणी सारख्या भरपूर द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
- गृह विलगणीकरणाच्या काळात विनाकारण घर सोडू नका.
- तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागत असेल तर घराबाहेर पडताना मास्क घाला आणि सुरक्षित अंतर पाळा.
- कोणत्याही रुग्णालयात जाण्यापूर्वी तेथील कर्मचार्यांना माहिती द्या. त्यांना सांगा की कोरोनामुळे तुम्हाला विलगीकरण सांगितले आहे.
तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर…
- जर तुम्हाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर घाबरू नका.
- तुम्ही स्वत: ला आयसोलेट म्हणजे इतरांपासून वेगळे करा.
- त्यानंतर पुढे काय करावे याचा विचार करा.
- सर्वात आधी डॉक्टरांशी बोला.
- तुमच्या संसर्गाच्या तीव्रतेनुसार ते तुम्हाला घरी की रुग्णालयात विलगणीकरण करायचे त्याचा सल्ला देतील.
- इतर कुणाचेही ऐकू नका, डॉक्टर जो सल्ला देतील तोच माना.
- सर्वात महत्वाचे व्हायरल सोशल मीडिया पोस्टच्या ज्ञानातून स्वत:च्या मनाने काहीही करु नका.
(डॉ. राहुल घुले हे सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय सेवेसाठी ओळखले जातात. मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना अवघ्या एक रुपयात वैद्यकीय सेवा पुरवणारी अभिनव संकल्पना राबवणाऱ्या वन रुपी क्लिनिकचे ते प्रणेते आहेत.)