मुक्तपीठ टीम
राम मंदिरच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर यंदाची ही पहिली रामनवमी असणार आहे. काही दिवसांपासून प्रशासनासह साधू-संत या उत्सवाच्या तयारीस लागले होते. कारण येत्या २१ एप्रिलला जल्लोषात रामनवमी साजरी केली जावी. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावेळीही इतर सणांप्रमाणे रामनवमी उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तसेच अयोध्येत रामनवमीच्या दिवशी अशाच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे, ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
अयोध्येत गेल्या २४ तासात २०० नवे संक्रमित आढळले असून तेथील रुग्णांचा आकडा १३११ वर गेला आहे. या आकडेवारीत आता बदलही झाला असू शकतो.
तसेच प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की, यंदाची रामनवमी भाविकांविना साजरी होईल. कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. फक्त मंदिरा पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे दूसरे वर्ष असेल जेव्हा अयोध्येत रामनवमीची जत्रा नसणार.
राम मंदिराचे पुजारी सत्येंद्र दास यांनी म्हटले की, “रामनवमी उत्सवानिमित्त भाविक राम मंदिरात दर्शनास येत आहेत. ५-५ च्या संख्येने त्यांना दर्शनासाठी पाठविले जात आहे. सामाजिक अंतर, मास्क अनिवार्य केले आहे. त्यामुळे यावेळीची रामनवमीही औपचारिकरीत्या साजरी केली जाणार आहे”.
त्यामुळे प्रशासनाने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन करत आपापल्या घरीच रामनवमी साजरी करा”, असे आवाहनही राम मंदिराच्या पुजाऱ्यांनी केले आहे.