मुक्तपीठ टीम
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. कुठे भाजपा, कुठे तृणमूल तर कुठे डावी आघाडी कुठे द्रमुक असे विजय होताना दिसत आहेत. पण त्याचवेळी मतांच्या आकडेवारीबरोबरच कोरोना रुग्णांचे आकडे पाहिले तर या पाच राज्यांमध्ये कोरोना प्रचंड वाढला असल्याचे दिसत आहे. जिंको कुणीही, हरो कुणीही, पण निवडणुकीच्या काळातच या पाच राज्यांमध्ये अल्पमतात असणारा कोरोना बहुमतात फोफावताना दिसला आहे.
बंगालमध्ये कोरोनाही बहुमताला ग्रासतोय…
बंगालमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस भयावह स्वरूपात वाढत आहेत. गेल्या २४ तासांविषयी बोलताना पश्चिम बंगालमध्ये एकूण 17,411 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याचबरोबर मृतांची संख्याही चिंताजनक नोंदविली जात आहे. बंगालमध्ये आतापर्यंत एकूण 8,28,366 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचवेळी मृतांची संख्या 11,344 वर पोचली आहे. राज्यातील सर्वात वाईट परिस्थिती ही राजधानी कोलकाताची आहे, जिथे दर दिवशी चार हजार नवे रुग्ण समोर येत आहेत.
पश्चिम बंगालः गेल्या एक आठवड्यातील वाढती रुग्णसंख्या
- 24 एप्रिल 14,281
- 25 एप्रिल 15,889
- 26 एप्रिल 15,992
- 27 एप्रिल 16,403
- 28 एप्रिल 17,207
- 29 एप्रिल 17,403
- 30 एप्रिल 17,411
आसाममध्येही कोरोनाची वाढ चिंताजनक
आसाममध्ये गेल्या सात दिवसांत दररोज सरासरी 2,810 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामध्ये गेल्या 24 तासांत 3,197 घटना नोंदल्या गेल्या आहेत. गेल्या 24 तासांत आसाममध्ये 26 जणांनी कोरोनाने आपला जीव गमावला. राज्यातील मृतांचा आकडा 1,307 वर पोहोचला आहे. राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना भीती वाटते की निवडणुकीच्या नादात कोरोनाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. तशीच स्थिती राहिली तर आगामी काळात आसाममध्ये दररोज सुमारे चार हजारांवर जाऊ शकतो.
केरळमध्ये कोरोनाची भीतीदायक स्थिती
केरळमधील कोरोनाची आकडेवारी भीतीदायक आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये कोरोनाची 37,199 नवीन प्रकरणे नोंदली गेली. त्याचवेळी 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये आतापर्यंत एकूण 15,71,183 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 5,308 लोक मरण पावले आहेत.
तामिळनाडूत कोरोना फोफावला
तामिळनाडूची परिस्थितीही वाईट होत चालली आहे. गेल्या 24 तासांत तामिळनाडूत एकूण 18,692 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून 113 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 11,66,756 प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याचवेळी मृतांची संख्या 14,046 वर पोचली आहे.
छोट्या पुद्दुचेरीत मोठी वाढ
पुडुचेरी या छोट्या केंद्रशासित प्रदेशात गेल्या 24 तासांत 1,195 प्रकरणे नोंदली गेली आणि 12 लोकांचा मृत्यू झाला. येथे एकूण 58,622 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि एकूण 805 लोक मरण पावले आहेत. गेल्या एका आठवड्यात दररोज सरासरी 1,036 प्रकरणे नोंदविली जात आहेत.
उत्तर प्रदेशात सर्वात भयावह स्थिती
या सर्व राज्यांपैकी सर्वात वाईट स्थिती उत्तरप्रदेशात आहे. गेल्या एका आठवड्यापासून येथे दररोज सरासरी 34,136 प्रकरणे नोंदविली जात आहेत. गेल्या 24 तासांत येथे 34,372 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 332 लोक मरण पावले. राज्यात आतापर्यंत 12,52,324 कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत. 12,570 लोक मरण पावले आहेत. तेथे पंचायती निवडणुका होत्या. आज तेथेही पंचायत समित्यांची मतमोजणी सुरु आहे.