मुक्तपीठ टीम
धुळ्यातून आलेली बातमी कोरोना संकटात माणुसकीचाही कसा बळी जात आहे ते दाखवतानाच सरकारी अव्यवस्थेलाही उघडे पाडणारी आहे. साक्री तालुक्यातील समोडे गावातील एका वृद्धाचे कोरोनाने निधन झाले. त्यानंतर त्याचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा कुठलेही वाहन मिळाले नाही. सरकार, मनपा किंवा रुग्णालय कोणत्याही प्रशासनाकडून कुटुंबाला वाहन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीतून मृतदेह स्मशानभूमीत नेत अंत्यसंस्कार केला.
समोडे गावात एका ७० वर्षीय वृद्धाचा रात्री २च्या सुमारास मृत्यू झाला. कटुंबियांनी अंत्यसंस्काराला वाहन मिळावे यासाठी तब्बल दहा तास वाट पाहिली. आता रुग्णवाहिका येईल, नंतर येईल करत दहा तास लोटले. अखेर ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीतून शेवटी मृतदेह स्मशानभूमीत न्यावा लागला. त्यानंतरच त्या कोरोनाने निधन झालेल्या वृद्धावर अंत्यसंस्कार करता आला.
इतर वेळी धुळ्यातील राजकारणावर आपले वर्चस्व आहे हे दाखवण्यासाठी धडपणारे अनिल गोटे, जयकुमार रावल हे आणि अन्य सर्वपक्षीय नेते लोकांच्या गरजेच्यावेळी कुठे गायब आहेत, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.