मुक्तपीठ टीम
भारत म्हटलं की व्हीआयपीशाही आलीच आली. पण आपल्याचे देशातील काही नेते असेही आहेत की जे सत्तेची कसलीही मिजास न बाळगता सेवाभावानं आजही वागतात. सध्या इंटरनेटवर मिझोरामचे ऊर्जा मंत्री आर. लालझिरलिआना यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात ते रूग्णलयांची लादी पुसताना दिसत आहेत. ते स्वतः कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाशी लढा देत असतानाही ते हे काम स्वतः करताना दिसत आहेत. त्यांच्यावर पत्नी व मुलासह एकाच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झोरम मेडिकल कॉलेजचा मजला स्वच्छ करताना त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्यावर स्तुतीचा वर्षाव झाला.या
एक मंत्री असूनही तुम्ही लादी का पुसली, असे त्यांना विचारल्यावर त्यांनी दिलेले उत्तर आपल्या व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. ते म्हणाले, “त्यांनी डॉक्टर आणि नर्स यांना लाज वाटावी म्हणून रुग्णालयातील लादी पुसली नाही, तर लोकांनी या कामातून काहीतरी शिकावे आणि एक आदर्श घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी सफाई कर्मचाऱ्याला बोलावले होते. जेव्हा तो आला नाही तेव्हा ते स्वत:च स्वच्छता करु लागले. तसेच त्यांनी जाहीररीत्या सांगितले की, मी स्वच्छता करण्यात गैर मानत नाही. घरीही वेळ मिळेल तेव्हा साफ-सफाई करणे मला आवडते.
मंत्रीमहोदय का रुग्णालयात?
• ८ मे रोजी त्यांना आणि त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
• ११ मे रोजी त्यांच्या पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला.
• मंत्री आर. लालझिरलिआना यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्यांना राज्यातील एकमेव कोरोना रुग्णालयात, झोरम मेडिकल कॉलेज येथे आणण्यात आले.
• तेथे त्यांच्यांवर वेळीच उपचार झाले आणि ते धोक्यातून बाहेर आले.
• आता त्यांची ऑक्सिजन पातळी स्थिर आहे.