“सारी समर्थांची…माझ्या सदगुरुंची कृपा !”
विनायकराव अगदी नम्रतेनं सांगत होते.
विनायकराव हेमाडे. तेच शेतकरी…ज्यांनी शेतीत लाखोंची कोथिंबीर पिकवली. विकली. ज्यांच्याबद्दलच्या पोस्ट गेले काही दिवस समाज माध्यमांमध्ये वायरल आहेत. आपल्या मातीतील अशा अस्सल नायकांपैकीच एक म्हणजे विनायकराव हेमाडे.
विनायकरावांविषयी पोस्ट वाचली आणि ठरवलेलं या माणसाशी बोलायचं. आपले बहुतांश शेतकरी असतात तसा साधा माणूस. मोकळा ढाकळा. हातचं राखून न बोलणारा. मी फोन केला तेव्हा ते नांदूरशिंगोटे गावातील शेतातच होते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हे गाव.
विनायकराव हेमाडे चर्चेत आले ते कोथिंबीर विकून १५ लाखाचं उत्पन्न मिळवल्यामुळे. त्यांनी बजावलेली कामगिरी सर्वांना खूश करणारी. त्यांनी दीड एकरातील कोथिंबीर आधी अडीच लाखात विकली. त्यानंतर चार एकरातील १२ लाख ५१ हजारांना. परिसरातील व्यापारी शिवाजी दराडे यांनी घेतली. त्यांच्या या कर्तृत्वगाथेमुळे ते व्हायरल चर्चेचा विषय ठरले. कौतुकाचे मानकरी. मात्र, आता जरी कौतुक सुरु असलं तरी विनायकरावांचे पाय शेतातल्या मातीतच रोवलेले आहेत. ते शांतपणे मला बोलले, “गेल्या वर्षीच फटका खाल्ला होता. कोथंबिरीतच. पावसानं नासाडी केल्यानं सर्व गमावलं होतं. पण तरीही व्यवस्थित विचार केला आणि यावेळी कोथिंबीरच घेतली.”
एवढा विचार करूनच निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्याचं जीवन जाणून घ्यावं असंच. विनायकराव सुशिक्षित पदवीधर. बीएची पदवी घेतली. पण मातीविषयी आवड. ठरवलं शेतातच करिअर करायचं. हाती जमीन कोरडवाहू. मग शांतपणे एक एक पाऊल उचललं. २० वर्षांपासून गाई घेण्यास सुरुवात केली. एक गाय, मग दुसरी करत करत वीसपर्यंत पोहचले. त्यांच्या गावात अनेकदा पाण्याची टंचाई. काही वेळा दुष्काळात तर पाणीही नव्हते. टँकरने पाणी मिळायचे. त्यातून काही पाणी ते गाईंसाठी राखून ठेवायचे. कितीही महाग झाला तरी चारा विकत आणायचे. काही वेळा तर दूध विक्रीतून आलेले सर्व पैसे जनावरांवरच खर्च व्हायचे. पण मागे हटले नाहीत. दुधाचे पैसे जनावरांना द्यायचे.
चांगल्या वर्षी दूधाचे पैसे उरायचे. त्यातून त्यांनी शेतासाठी बोअर घेणं सुरु केलं. असं करता करता शेताचा पसारा वाढू लागला. नुकसानही व्हायचं. पण हिंमत हरले नाहीत. सातत्य ठेवले. मेहनत सुरु ठेवली. गेल्या वर्षी पाऊस जास्त झाला. कोथिंबीर हातची गेली. विनयाकरावांनी मनाला समजवलं. पुन्हा मिळवू.
या वर्षी लॉकडाऊन सुरु झालं. त्यांनी अंदाज घेतला. कोंथबिर चालेल. प्रगतीशील शेतकरी विष्णू दराडे, कांदा व्यापारी सुदाम कारभारी शेळके यांचं मार्गदर्शन घेतलं. ठरवलं कोथिंबीर जास्त घ्यायची. ते गंमतीनं म्हणाले, “गावातील बियाणं विक्रेते आनंद घुले जास्त बियाणं घेतलं. त्यांना संशय आला. आपल्याकडून जास्त घेऊन कुणाला महागात विकतात की काय? शेवटी समजवलं, तेव्हा त्यांना पटलं”
विनायकरावांनी केवळ ठरवलं आणि फायदा झाला असं नाही. ते शेतातच गांडुळ खत, शेण खत बनवतात. त्याचा वापर योग्य प्रकारे केला. चांगलं फळ मिळालं. साडे पाच एकरात पंधरा लाखाचं उत्पन्न मिळालं.
खूप साधा माणूस. मला म्हणाले, “अहो मुलगा प्रचित दहावीला आहे. त्याला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल पाहिजे होता. आता देईन.” त्यांची लेक साक्षीही शिकतेय. पत्नी लता घर सांभाळतानाच शेत-गाईंवर मायेनं लक्ष ठेवतात. शेतकऱ्यांसाठी ते विस्तारित कुटुंबच.
आता विनायकरावांच अवघ्या महाराष्ट्रातून कौतुक होतंय. पण संघर्षाच्या काळात त्यांना कमालीचे कष्ट घ्यावे लागले. ते म्हणतात, “मला शेतीचा छंद आहे. पदवी घेऊनही त्यामुळे शेतातच रमलो.”
ते मुलांना सांगतात, “जास्तीत जास्त शिक्षण घ्या, नोकरी मिळो न मिळो पण शिक्षण घ्या. नंतर दुधाचा व्यवसाय करुया. वाढवुया. शेतीत करिअर करता येईल.”
त्यांना विचारलं. थोडं शिकलं की लोकांना मातीत राबायची लाज वाटते, मग तुम्ही शेतीत कसे? ते म्हणाले, “मला नाही वाटत. उलट एकच स्वप्न आहे. मातीचं सोनं करायचं.” आमचं बोलणं संपण्यापूर्वी त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिलेला सल्ला मोलाचा. ते म्हणाले, “आपण एखाद्याला एकदा कसला तरी फायदा झाला. किंवा एखाद्या पीकाला जास्त भाव आला तर हुरळतो. तसं नको व्हायला. माहिती घ्या. अंदाज घ्या. बाजारात काय चाललंय. काय स्थिती आहे. त्यानंतर योग्य मार्गदर्शन घेऊनच पीक ठरवा. आता जे चाललं ते नंतर चालेलच असं नाही. कष्टासाठी हात चालवता, तसं डोकंही चालवा !”
– तुळशीदास भोईटे
9833794961