मुक्तपीठ टीम
अवघा महाराष्ट्र बेताल बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जपात मग्न असताना महागाईची हडळ सामान्यांना त्रस्त करत आहे. आज सकाळपासून राज्याचा एकच अजेंडा पडळकरांचाच असल्याचे भासवले जात आहे, त्याचवेळी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, सामान्यांना त्रस्त करणाऱ्या महागाईची हडळ सोडून सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांनी पडळकरांचाच जप सुरु केल्याचे दिसत आहे.
गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ
- सरकारी कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत.
- यावेळी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
- आजपासून मुंबईत १४.२ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ८३४ रुपये ५० पैसे झाली आहे.
- कालपर्यंत मुंबईत १४.२ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ८०९ रुपये होती.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, सर्व सरकारी तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमती कमी कराव्यात, वाढवायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतात. यापूर्वी एक मे रोजी गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली होती. तेल कंपन्यांनी एप्रिलमध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतीत दहा रुपयांची कपात केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये एलपीजी सिलिंडर महाग झाले.
एकीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली असतानाच गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतही सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक महागाईत होरपळत आहेत. मात्र, विरोधातील राजकीय पक्षही महागाईच्या मुद्द्यावर तेवढे आक्रमक होताना दिसत नाहीत. याउलट पडळकर सारख्यांच्या विषयावर सर्वपक्षीय आक्रमकता जास्त दिसत असल्यानेच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सहा राज्यामध्ये पेट्रोल शंभरीपार
- देशातील ६ राज्यात पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले आहे.
पेट्रोल डिझेल आणखी भडकणार
- कित्येक देशांत लॉकडाऊन उघडल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे.
- याशिवाय कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी इराणवर लादलेली बंदी उठवली नाही.
- त्यामुळे देखील कच्च्या तेलाची किंमत सतत वाढत आहे.
- तत्कालीन ट्रम्प प्रशासनाने इराणवर घातलेल्या निर्बंधानंतर भारताने २०१९ च्या मध्यापासून इराणकडून तेल आयात करणे थांबवले.
- अमेरिकन अर्थव्यवस्था आता पूर्ण खुली करण्यात आली आहे. यासह युरोपियन देशांमध्ये निर्बंध कमी करण्यात आले आहेत. यामुळे पेट्रोलियम पदार्थांची मागणी वाढत आहे.
- हेच कारण आहे की सध्या कच्चा तेलाचे दर वाढत आहेत.
- अमेरिकन बाजारामध्ये कच्चा तेलाची किंमत प्रति बॅरल ७१.५७ वर पोहोचली आहे.
- येत्या काळात कच्च्या तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकतात.