मुक्तपीठ टीम
राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेली मदत दिलासा देणारी नाही तर तुटपुंजी आहे. एनडीआरएफचे निकष जुने आहेत त्यामुळे दुप्पट नाही तर त्यापेक्षा जास्त मदत देणे गरजेचे आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी व थट्टा करणारी आहे. अतिवृष्टग्रस्तांना भरीव मदत द्या अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित आझादी गौरव पदयात्रेदरम्यान नाना पटोले औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना १५ हजार रुपयांची मदत देण्यात आली होती पण ती मदत अपुरी आहे म्हणून आत्ता सत्तेत असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती मग आता जाहीर केलेली मदत दिलासा देणारी कशी? काँग्रेस पक्षाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ७५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती सरकारने मात्र फक्त १३ हजार रुपये जाहीर केले आहेत ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मदत देताना ३ हेक्टरची मर्यादा घातली आहे ती सुद्धा अन्यायकारक असून ही मर्यादा काढून टाकावी.
राज्यात आता सत्तेवर आलेले सरकार हे शेतकरी विरोधी आहे. महाराष्ट्राचा पैसा गुजरातला कसा देता येईल यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली गेली पाहिजे तसेच घरांची पडझड, छोटे दुकानदार, टपरीवाले यांना किती मदत देणार हे स्पष्ट केलेले नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना अतिवृष्टी व मुसळधार पावसाने नुकसान होताच तातडीने १० हजार रुपयांची रोख मदत जाहीर केली होती व नंतर पॅकेजही दिले होते पण भाजपा शिवसेनेचे हे सरकार शेतकऱ्यांना मदतीच्या नावावर लॉलीपॉप दाखवून वाऱ्यावर सोडत आहे हे दुर्दैवी आहे.
शिवसेनेने काँग्रेसशी चर्चा करायली हवी होती…
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ साली राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन करण्यात आले होते. आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असली तरी महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल शिवसेनेने काँग्रेस पक्षाशी चर्चा करायला हवी होती. विरोधी पक्ष नेते ठरवताना शिवसेनेने काँग्रेसशी चर्चा केली नाही. यावर एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे असे नाना पटोले म्हणाले.
औरंगाबादमधील आझादी गौरव पदयात्रेत नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री अनिल पटेल, सेवादलाचे विलास औताडे, माजी आमदार एम. एम. शेख, नामदेव पवार, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे, डॉ. जफर खान, शहर अध्यक्ष शेख युसुफ, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आ. कल्याण काळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. उद्या दि. १२ ऑगस्ट रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नाशिक जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत सहभागी होणार आहेत.