मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या आपत्तीत काँग्रेस पक्ष नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागिराकांच्या मदतीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यात कोरोना सहायता केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रामार्फत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम सुरु आहे. वैद्यकीय मदतीसोबतच रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तसंकलन करण्याचे कामही जोमाने सुरु आहे. हे कार्य आता तालुकास्तरापर्यंत नेण्यात येणार आहे.
राज्यभरातील कोरोना सहायता केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज टिळक भवन येथील कंट्रोल रूममध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, डॉ. गजानन देसाई, टिळक भवन येथील मुख्य कोरोना सहायता मदत केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रदेश सचिव राजाराम देशमुख. डॉ. संजय लाखे पाटील, झिशान अहमद आदी सहभागी झाले होते. बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर कोरोना मदत केंद्र स्थापन करणे व प्रत्येक केंद्रात टिम नेमणे, लोकांना आवश्यक ती वैद्यकीय मदत कशी पुरवता येईल तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांच्या संपर्कात राहून आवश्यक असेल तेथे रक्तदान शिबिरे आयोजित करणे, यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. जिल्हा स्तरावर सुरु असलेल्या या मदत केंद्राच्या कामाची माहिती यावेळी घेऊन हे कार्य तालुकास्तरापर्यंत पोहचवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मदत कार्यात ज्या अडचणी येतील त्या राज्य स्तरावरील केंद्राला कळविल्या जातील व त्या समस्या सोडवण्याचे काम केले जाणार आहे. दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयातील कोविड वॉर रुम ते तालुकास्तरावरील मदत केंद्र यांच्यात योग्य तो समन्वय साधून लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले जाणार आहे. महात्मा फुले जयंती व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिरेही घेण्यात आली होती. आवश्यकता पडल्यास आणखी रक्तदान शिबिरे घेण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले.