मुक्तपीठ टीम
सोनिया गांधी यूपीएचे अध्यक्षपद भुषवत असतानाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सातत्याने शरद पवार यांनीच यूपीएचे अध्यक्षपद भुषवले पाहिजे अशी भूमिका मांडत असतात. आज राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना “शरद पवार यांनी युपीएचं अध्यक्षपद भूषवायला हवं”, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. यावरून आता काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी तर थेट राऊतांना टोला मारला. ते म्हणाले, संजय राऊत शिवसेनेत की राष्ट्रवादीत तेच कळत नाही. त्यांच्या वक्तव्याला फार महत्व देण्याची गरज नाही.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेतेही नाराज झाल्याची चर्चा आहे. हुसेन दलवाई यांनी सरळस्पष्ट शब्दात राऊतांच्या विधानांवर झोड उठवली आहे, “संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असा गोंधळ निर्माण झालेला आहे. बऱ्याचदा ते अशी आवई उठवतात आणि नंतर गोत्यात येत असतात. मुळात त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. राज्यातल्या सरकारमुळे काँग्रेस नसून काँग्रेसमुळे हे सरकार बनलेलं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचा वाद निर्माण करताना त्याचं भान त्यांनी ठेवणं आवश्यक आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही.”
राऊतांची ‘ही’ मागणी काँग्रेसला डिवचणारी!
• संजय राऊत हे गेले काही दिवस सातत्याने यूपीएच्या नेतृत्वबदलाबाबत बोलत आहेत. आजही पुन्हा ते बोलले.
• संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा सध्या कांग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे आहे.
• सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे प्रभारी अध्यक्षपदही आहे.
• दिल्लीत सध्या यूपीएच्या नेतृत्वावरून चर्चा सुरू असताना, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यावर भाष्य केले.
• राऊत म्हणाले, ‘यूपीएचं नेतृत्व काँग्रेस व्यतिरिक्त दुसया पक्षाने करण्याची चर्चा सुरू आहे. आघाडीचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडं देण्याला यूपीएतील घटक पक्षांकडून कोणताही विरोध नाही.
• याआधी काँग्रेसने मुळात शिवसेना यूपीएचा घटक नसताना राऊतांनी नको ती उठाठेव करू नये असेही बजावले होते.
फडणवीसांचाही राऊतांना टोला!
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या “शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करावे” या मागणीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी खोचक भाष्य केले आहे.
“युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय. त्यांच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसते. त्यासाठी टीममध्ये असायला लागते. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो,” असा टोला फडणवीसांनी राऊतांना मारला आहे.
मुक्तपीठ मत
संजय राऊत यांनी अनेकदा स्पष्टपणे ते शिवसेनेत असले तरी शरद पवारांनाही मानतात हे उघड मांडलेले आहे. त्यात लपवाछपवी नाही. दिल्लीतील पत्रकारांच्या वर्तुळातही राऊतांना पवारांच्या निकटस्थ म्हणून ओळखले जाते. शिवसेनेतील त्यांच्याविरोधातील गटही त्यांच्याविरोधात हा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न करत असतो. काहीवेळा त्यांची भूमिका ही शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या कलाने ठरते, असाही आक्षेप घेतला जातो. पण राऊत त्यांची भूमिका मांडताना जे काही ते रोखठोक मांडतात. शिवसेनेत त्यांच्यासारखा कुणालाही अंगावर घेणारा दुसरा नेता नाही. तसेच शरद पवारांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध महाविकास आघाडीचे समीकरण जुळवताना कामाला आले. पण मुख्यमंत्री शिवेसेनेचा झाला तरी सर्व महत्वाची खाती राष्ट्रवादीला दिली गेली. त्यामुळे ‘ठाकरे सरकार पण राष्ट्रवादीला अधिकार’ अशीही टीका होत असते. यूपीएच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने बोलणे म्हणजे काँग्रेस नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल अविश्वास दाखवणे आहे. आघाडी सरकारमध्ये एका पक्षाला आपल्या आवडीखातर खूश करताना दुसऱ्या पक्षाला दुखावणे धोक्याचे ठरू शकते. राजकारणात कुणालाही सदासर्वदा गृहित धरु नये.
- तुळशीदास भोईटे, संपादक, मुक्तपीठ