मुक्तपीठ टीम
घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून उद्या १४ एप्रिलला काँग्रेसच्यावतीने व्हर्च्युअल अभिवादन सभा तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येत आहे. राज्यातील रक्ताची गरज लक्षात घेऊन राज्यभर रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. जिल्हा मुख्यालयी व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी ९ ते १२ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार असून आघाडी संघटना, विभाग व सेलच्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये सक्रीय सहभाग राहणार आहे. या रक्तदान शिबिरातून राज्यभरातून २५ हजार रक्त पिशव्या संकलीत केल्या जाणार आहेत.
व्हर्च्युअल अभिवादन सभा ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, राज्याचे सहप्रभारी आदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या व्हर्च्युअल कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीव्दारे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसने केले आहे.
कोरोनाचे संकट व त्यात रक्ताचा तुटवडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटसमयी धावून जाण्यात, मदतीचा हात देण्यात काँग्रेसपक्ष नेहमीच आघाडीवर राहिला आहे. सध्याची गरज ओळवून सामजिक दायित्वाच्या भावनेतून रक्तदान सप्ताह घेतला जाणार आहे. या रक्तदान शिबिरात युवक काँग्रेस, एनएसयुआय, सर्व सेल व फ्रटंलचे सदस्य सहभाग घेतील. या माध्यमातून जमा करण्यात आलेले रक्त हे शासकीय रक्तपेढ्यांना दिले जाईल. मुंबईतून १० हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प मुंबई काँग्रेसने केला आहे.