मुक्तपीठ टीम
गरीब कुटुंबांना आणि लष्कराला दिल्या जाणाऱ्या डाळीमध्ये भाजप सरकार भ्रष्टाचार घोटाळा करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपने डाळ घोटाळा करून देशाची ४ हजार ६०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे की, २०१८ मध्ये भाजपने डाळींच्या निविदा प्रक्रियेत बदल केला आणि नवीन निविदा जारी केल्या ज्यामध्ये ४ हजार ६०० कोटींचा घोटाळा झाला.
सिंघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड संपूर्ण कडधान्ये खरेदी करते आणि डाळी मिल्समधून पॉलिशिंग आणि दळणे यासारख्या प्रक्रिया करते. याचा ठेका कोणाला मिळणार हे निविदेद्वारे ठरवले जाते आणि ज्याने सर्वात कमी बोली लावली त्यालाच निविदा मिळते. सिंघवी यांच्या म्हणण्यानुसार, डाळींच्या मिलमध्ये १०० किलो कडधान्यांचे डाळीमध्ये रूपांतर करून जवळजवळ ७० ते ७५ किलो डाळ मिळते. परंतु, सरकारने २०१८ मध्ये यासाठीचा नियम बदलला.
सरकारने लिलावाऐवजी आऊट-टर्न रेशो प्रणाली लागू केली, त्यानुसार जो जास्तीत जास्त डाळ परत करेल, त्यालाच निविदा मिळेल. असे केल्यामुळे बहुतेक छोट्या गिरण्या निविदेतूमधून बाहेर पडल्या आणि बाजारातील मोठ्या मंडळींना निविदा काढायला मोकळी सूट मिळाली. सिंघवी यांच्या म्हणण्यानुसार, मोठमोठ्या कंपन्या स्वत: बाहेर करार करतात आणि कमीत कमी डाळीचे प्रमाण निश्चित करतात आणि उरलेला माल बाजारात विकून मोठा नफा कमावतात.