मुक्तपीठ टीम
“कोणत्याही शेतकऱ्याचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान होऊ नये ही शासनाची भूमिका आहे. असे झाल्यास २६ दिवसांच्या आत नुकसानभरपाई देण्यात येईल”, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देतांना दिली.
कोकणात वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांच्या होत असलेल्या नासाडीसंदर्भात सदस्य योगेश कदम यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री नितेश राणे, भास्कर जाधव, बच्चू कडू आदिंनी सहभाग घेतला.
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, “कोकणात माकडांची तसेच रानडुकरांची संख्या जास्त आहे. माकडांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हिमाचल प्रदेश येथे वन्यजीव सुरक्षा अधिनियमानुसार माकडांची नसबंदी करण्यात येऊ शकते. या आधारावर केंद्र शासनाची विशेष अनुमती घेऊन माकडांची नसबंदी करता येईल.
वन विभागाचे अधिकारी आणि कृषी विद्यापिठाचे अधिकारी यांच्या सहकार्याने नुकसानीची मोजणी केली जाईल. तसेच वन विभागात तीन हजार पद भरती केली जाईल”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.