मुक्तपीठ टीम
दुकानाचं नाव असलेल्या प्लॉस्टिक पिशवीसाठी ग्राहकाकडून सहा रुपये वसूल करणे एका सुपर मार्टवाल्याला भलतंच महाग पडलं आहे. त्या ग्राहकाने ग्राहक आयोगात दाद मागितली. आयोगाने त्या सुपर मार्टच्या व्यवस्थापनाला एकतीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
घरगुती वस्तूंसह प्लॉस्टिक पिशवीची किंमत वसूल करण्याच्या प्रकरणावर उत्तराखंडमधील नैनिताल जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने सुनावणी केली. या प्रकरणी आयोगाने हल्दवानी येथील एका आस्थापनाच्या व्यवस्थापनाला दीड महिन्याच्या आत फिर्यादीला २५ हजार रुपये मानसिक वेदना आणि ५ हजार रुपये न्यायालयीन खर्चाची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अनुचित व्यापार व्यवहारासाठी दंड म्हणून एक हजार रुपये आयोगाच्या जिल्हा कार्यालयाच्या तिजोरीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्राहकाचा लढा, सुपर मार्टला धडा!
- हल्द्वानी देवलचौड खाम येथील रहिवासी गोविंद बल्लभ पंत यांनी बी मार्टच्या प्रभारी विरोधात ग्राहक आयोगात दावा दाखल केला.
- त्यांनी सांगितले की, यावर्षी २३ जून रोजी बी मार्टमधून ३०० रुपयांच्या घरगुती वस्तू खरेदी केल्या.
- मार्टने त्यांना त्या वस्तू प्लॉस्टिक पिशवीमध्ये दिल्या.
- फिर्यादीने सांगितले की, घरी जाऊन बिलात सामान तपासले असता, मार्ट व्यवस्थापनाने सामानाच्या बिलासह प्लॉस्टिक पिशवीसाठी सहा रुपये जादा घेतल्याचे आढळून आले.
- आस्थापनाची जाहिरातही प्लॉस्टिक पिशवीमध्ये छापण्यात आली असल्याने हे नियमाविरुद्ध असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
आयोगाचे अध्यक्ष रमेश कुमार जैस्वाल, सदस्य विजय लक्ष्मी थापा, लक्ष्मणसिंग रावत यांनी सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आयोगाने बी मार्ट व्यवस्थापनाच्या सेवेत उणीव आढळून आल्याने वादीला तीस हजार रुपये आणि अनुचित व्यवसायासाठी दंड म्हणून एक हजार रुपये आयोगाच्या जिल्हा कार्यालयाच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.