मुक्तपीठ टीम
येत्या पाच दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत थंडी कायम राहणार असून महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि देशाच्या इतर काही विविध भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
येणारे दिवस आणखी थंड राहणार- हवामान खात्याचा इशारा
हवामान खात्याने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश व्यतिरिक्त, पुढील दोन ते तीन दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या विविध भागांमध्ये सामान्य थंडीपासून तीव्र थंडीपर्यंतची परिस्थिती अपेक्षित आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात पुढील पाच दिवस थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे.
देशाच्या ‘या’ भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता
विभागानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, बिहार, बंगाल, ओडिशा, आसाम, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या विविध भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
२६ जानेवारीनंतर दिल्लीतील थंडी वाढणार!
हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी सांगितले की, २६ जानेवारीनंतर दिल्लीतील थंडीची लाट अधिक तीव्र होईल. दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये २ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कारण वेस्टर्न डिस्टर्बन्स पूर्वेकडे सरकला आहे. या कडाक्याच्या थंडीत बेघरांना दिलासा मिळावा यासाठी दिल्ली सरकारने रस्त्यांच्या कडेला निवारे बांधले आहेत.