मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाईबद्दल ते जाहीर काही बोलले नसले तरी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्र्यांसमोर त्यांनी आपला पवित्रा आक्रमकच असल्याचे संकेत दिले. काही झालं तरी झुकायचं नाही तर लढायचंच असाच संदेश दिला. तसंच राज्यातील यंत्रणा भाजपाच्या घोटाळेबाज नेत्यांवर कारवाई करत नसल्याचं मांडलं जाताच लवकरच कारवाई दिसेल असेही संकेत त्यांनी दिल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे लवकरच भाजपाच्या घोटाळ्यांचे आरोप झालेल्या नेत्यावर राज्य यंत्रणेची कारवाई होताना दिसेल, अशी शक्यता आहे.
भाजपा सत्तेतील प्रकरणांवर कारवाईची मागणी
- मंत्रीमंडळ बैठकीनंतर केवळ मंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय यंत्रणांचा वाढत्या कारवाईंवर चर्चा झाल्याचे कळते.
- काँग्रेसचे सुनील केदार यांनी हा विषय बैठकीत उपस्थित केला. गुलाबराव पाटील, दादा भुसे, जयंत पाटील आदी मंत्र्यांनीही मते मांडली.
- भाजपाचे नेते धुतल्या तांदळासारखे नाहीत, असे जनतेचेही मत आहे.
- मात्र ज्याप्रकारे त्यांना दिलासा मिळत आहेत, ते आश्चर्यकारक आहे.
- राज्याच्या विविध खात्यांमधील मागील सरकारची अनेक प्रकरणे आपल्याही कानावर आहेत.
- ही प्रकरणे आता काढावीच लागतील.
- मात्र हे आघाडीचे सरकार आहे, याचे भान आपल्याला ठेवावे लागते.
- अशा प्रकरणांची त्या-त्या विभागाकडून माहिती मागवली असता, ही आमच्या कारभारात ढवळाढवळ असल्याची कारणे कुणी पुढे करता कामा नयेत.
राज्य सरकारची कारवाई लवकरच दिसेल!
- ईडी, सीबीआय, एनआयए आदी केंद्रीय यंत्रणांचा राज्यात हस्तक्षेप वाढत आहे.
- मात्र हा हस्तक्षेप केवळ महाराष्ट्रापुरता नसून, सगळ्याच बिगरभाजप राज्यांमध्ये याचप्रकारे त्रास देणे सुरू असल्याचे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले.
- मात्र पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि केरळमध्ये पिनराई विजयन या दोन मुख्यमंत्र्यांपुढे केंद्रीय यंत्रणांची डाळ शिजत नाही.
- ईडी व सीबीआयच्या अधिकाऱ्यांना राज्यातील यंत्रणा जशास तसे उत्तर देत असल्याने या राज्यांमध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर करताना संबंधित अधिकाऱ्यांना दहावेळा विचार करावा लागतो, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनाच समन्स कसे जारी केले, याच्या बातम्याच मुख्यमंत्र्यांना दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले.
- महाराष्ट्रातील सरकार अशाप्रकारचे धाडस दाखवू शकत नाही, असा संदेश सर्वदूर गेला आहे.
- त्यामुळे महाविकास आघाडीचे जनतेतील सहानुभूतीदार नाराज आहेतच; शिवाय सरकारी अधिकारीही अशा प्रकारच्या कारवाईसाठी सहकार्य करण्यास तयार होत नाहीत, अशी व्यथा एका मंत्र्याने मांडल्याचे समजते.
- उद्धव ठाकरे यांनी सगळ्या मंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
- ‘सरकार याबाबत मिठाची गुळणी करून बसल्याचे म्हणणे योग्य नसून, सरकारने यात योग्य ती पावले उचलली आहेत.
त्याचे परिणाम लवकरच तुम्हाला दिसतील,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.