मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडाऱ्यात आहेत. त्यांनी भंडारा अग्निकांडातील दहा बालकांचा मृत्यूसाठी जर कुणी दोषी असेल तर कडक कारवाईचा पुनरुच्चार केला. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानं चौकशी होत असतानाच मुंबईतील अग्निशमन दलाचे माजी प्रमुख प्रभात रहांदळेच्या नेतृत्वाखालील वेगळ्या चौकशीचीही घोषणा केली.
भंडाऱ्यात पोहचल्यावर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दात मत मांडलं. ते म्हणाले, “ह्दय पिळवटून टाकणारी घटना आहे. जे घडलं ते आम्ही खूप गंभीरतेने घेतलंय. माझ्यासोबत मंत्री आले आहेत. मी आता कुटुंबीयांना भेटलो. हात जोडून उभे राहिल्याशिवाय काहीच करु शकत नाही. मात्र, चौकशी करावीच लागणार. याच्या मुळापर्यंत जावं लागणार. उगाच कुणाकडे आरोपी म्हणून पाहणार नाही. पण जर साधनांची कमतरता, अनास्था असेल, माहिती मिळाली होती तरी कार्यवाही झाली की नाही ते तपासले जाईल. जर कुणीही निष्काळजीपणासाठी जबाबदार असेल तर कारवाई केली जाईल,”
आज प्राथमिक अहवाल, तीन दिवसात चौकशी अहवाल
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. प्राथमिक अहवाल आजच येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त शिशू केअर युनिटची पाहणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून शनिवारी करण्यात आली. या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतानाच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अशा दुर्घटना घडू नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांना खबरदारीच्या उपायांची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच आवश्यक ते निर्णय घेतले जातील असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांची वीज यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणेची तत्काळ तपासणी करण्याच्या सूचना राज्यमंत्री यड्रावकर यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या आहेत.