मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिकतेच्या भूमिकेतून राजीनामा दिला असून तो स्वीकारल्याचे सांगितले. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमकतेबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच त्यांनी भाजपावर प्रतिहल्ला चढवला.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणतेही पत्र नाही, तरीही भाजपा नेते सरकारविरोधात गदारोळ माजवत आहेत. तपास अहवाल येण्यापूर्वीच तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवला जातो. मात्र, हेच भाजपाचे नेते दादरा नगर हवेलीचे खासदार डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी का बोलत नाहीत? त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठीत भाजपाच्या काही नेत्यांची नावे आहेत, असे म्हटले जाते. पण त्यावर भाजपाचे नेते काही बोलत नाहीत. असे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना विचारला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
संजय राठोड प्रकरण
- न्यायाने वागणे, ही आमची जबाबदारी. तपास निपक्षपातीपणे केला गेला पाहिजे. कायद्यानुसार कारवाई व्हावी ही राज्य सरकारची भूमिका आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे, असा तपास होता कामा नये.
- तुम्ही सांगाल तसा तपास होऊ शकत नाही. संजय राठोडांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे.
- ज्याक्षणी घटना घडली त्याचवेळी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासाच्या अहवालातून जे सत्य बाहेर येईल, त्यानंतर कुणालाही पाठिशी घालणार नाही.
- चौकशी नीट होऊ द्या, तपास नीट होऊ द्या. तुमच्यावेळीही हीच तपास यंत्रणा होती. त्यावेळी जर तुमचा या तपास यंत्रणेवर विश्वास तर आता अविश्वास का?, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
- अनिल परब यांच्याकडून पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राचं वाचन.
- ज्यांच्या मुलीचा जीव गेला त्यांचा तपास यंत्रणेवर विश्वास आहे. तपासाअंती जे सत्य समोर येईल, त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईलच.
- महाराष्ट्राच्या हिताचं स्वप्न पुढे घेऊन जात असताना, कारण नसताना केवळ आपली सत्ता नाही म्हणून सरकारची, महाराष्ट्राची बदनामी करु नका.
- राजीनामा स्वीकारलेलाच आहे.
- वनखात्याचा कारभार आता माझ्याकडे आहे.
- तुम्ही म्हणताय म्हणून गुन्हा दाखल करणं, असं कधी होत नाही, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना प्रत्युत्तर
- नैतिकतेला धरुन संजय राठोडांनी राजीनामा दिला.
- पोहोरादेवीत ज्यांनी ज्यांनी शक्तीप्रदर्शन केलं, गर्दी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत.
इतर मुद्दे
- कोरोनाची दुसरी लाट वाढू न देता थोपवण्याचा प्रयत्न आहे.
- ८ मार्चला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील.
- विरोधी पक्षाचे पत्रकार परिषदेतले आरोप अर्थहिन.
- कोव्हिड काळातले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत.
- विरोधी पक्ष कोव्हिड योद्ध्यांची थट्टा करत आहेत.
- ज्यांना सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे माहिती नाही, त्यांचे आरोप हास्यास्पद आहेत
- मराठा आरक्षणावर विरोधकांचं सहकार्याचं आश्वासन, त्याबद्दल धन्यवाद देतो.
- केंद्रातलं सरकार सर्वकाही ओरबाडतंय, विरोधकांवर टीका
- इंधनावर अशा पद्धतीने कर लावलेत की ज्यामुळे केंद्राच्या तुंबड्या भरणार आहेत.