मुक्तपीठ टीम
“पालघर जिल्ह्यात नुसती आरोग्य व्यवस्थाच नाही तर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी दळणवळण, उद्योग, पर्यटन या सर्वांचा एकत्रित विचार केला पाहिजे. रोजगार मिळाला पाहिजे,” असं सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “पालघर विकासासाठी आमची बंद दाराआड काय चर्चा झाली ते आताच सांगून टाकतो,” म्हणत गृहमंत्री अमित शाह यांचे नाव न घेता टोला लगावला.
राणेंच्या कार्यक्रमात शाहांनी पुन्हा काढली बंद दाराआडची चर्चा!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार नारायण राणे यांच्या कार्यक्रमासाठीच्या सिंधुदूर्ग दौऱ्यावेळी बंद दाराआडच्या चर्चेचा विषय पुन्हा छेडला होता. “आम्ही बंद दाराआड कोणतेही वचन दिलं नव्हते,” असा दावा करत युती तुटण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेला जबाबदार ठरवले होते. यावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांवर थेट काही विधान केले नसले तरी त्यांचे हे विधान त्यासाठीचा टोलाच आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पालघर दौऱ्यात विकासाचा रोड मॅप
“पालघर तसा नव्याने जाहीर झालेला जिल्हा आहे. जिल्हा म्हणून तिथे काही सोयी सुविधा निर्माण करुन देणं सरकारचं कर्तव्य आहे. सोयी सुविधा निर्माण करुन देताना कुपोषण ही मोठी समस्या आहे. हा विषय समोर आल्यानंतर तेवढ्यापुरतं लक्ष दिलं जातं. आपल्याला हे कुपोषण पूर्णपणे थांबवायचं आहे. ते जर थांबवायचं असेल तर संपूर्ण विभागाचा विकास करणं गरजेचं आहे,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
पालघर विकासासाठी निलेश सांबरेंचेही निवेदन
- पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरेही मुख्यमंत्र्यांच्या पालघर दौऱ्यासाठी उपस्थित होते.
- गेली काही वर्षे ते सातत्याने जिल्हा विकासासाठी आवाज उठवत आहेत
- जिल्हा स्थापन झाला पण जिल्हा रुग्णालय नसल्याने रुग्ण गुजरातमध्ये जावे लागते, त्यामुळे त्यांनी जिजाऊच्या माध्यमातून रुग्णालय, आरोग्य सेवा सुरु करण्यात आली आहे.
- आजवरच्या जिल्हा विकासाविषयीच्या अनुभवांवर आधारीत मागणी करणारे एक निवेदन निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपवले
पालघर विकासाचा रोड मॅप
- जव्हारमध्ये आलो आहे म्हणजे फक्त जव्हार नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्याचा विकास करायचा आहे.
- या विभागाला चांगला समुद्रकिनारा लाभला आहे.
- जव्हार एक हिल स्टेशन म्हणून विकसित होऊ शकते.
- आदिवासी संस्कृती जपत आदिवासींचा विकास केला पाहिजे.
- पर्यटनासाठी विकास केला तर अनेक समस्या नष्ट होतील.
- नुसती आरोग्य व्यवस्था नाही तर पालघर जिल्ह्यात चांगला रोजगार मिळाला पाहिजे.
- जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी दळणवळण, उद्योग, पर्यटन या सर्वांचा एकत्रित विचार केला पाहिजे.
- मी आज थोडक्यात आढावा घेतला आहे. काही प्रस्ताव आले असून काही येणं बाकी आहे.
- जलदगतीने विकासाची गाडी मला रुळावर आणायची आहे.
- मी फक्त सवंग लोकप्रियतेसाठी काही घोषणा करणार नाही.
- आजपासून पालघर जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात झाली आहे एवढंच सांगेन.
- निधी वगैरे इतर गरजा पूर्ण केल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही.
राज्यपालांचं विमान आणि छोटी धावपट्टी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यपालांनाही कोपरखळी मारली. “पालघरमध्ये सगळ्यांची विमानं उतरतील अशी छोटी धावपट्टीही निर्माण करु असा विकास झाला पाहिजे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. याचा संदर्भ राज्यपाल हवाई दौऱ्याविषयीच्या वादाशी आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात काय झाले?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या जव्हार भागातील रुग्णालयाची पाहणी केली.
- जामसर येथील बाल उपचार केंद्र , कॉटेज हॉस्पिटल , खरवंद अंगणवाडी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची देखील पाहणी केली.
- जव्हार सारख्या ग्रामीण भागात असलेली आरोग्यव्यवस्था सुधारण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले . तसेच जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यू च प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या याचा आढावा घेतला
- पालघर हा नव्याने तयार झालेला जिल्हा असून कोवळी पानगळ हा वर्षानुवर्षे चा विषय आहे, हे प्रत्येकाने मान्य करावे लागेल. तर जेव्हा विषय वर येतो तेव्हाच लक्ष दिलं तस नाही तर कायमचा उपाय करावा लागेल.