मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी नाशिकपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. मध्यरात्री २ वाजता मुख्यमंत्री मालेगावमध्ये पोहोचले. यावेळी शिंदे समर्थकांसह यावेळी शिंदे समर्थक आमदार दादा भुसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंचं जंगी स्वागत केलं. तसेच पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी शनिवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आलेल्या एकनाथ शिंदे यांचे रात्री ११ वाजता पाथर्डी फाटा येथे त्यांच्या समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. पाथर्डी फाटा येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात शिंदे म्हणाले की, राज्यात स्थापन झालेले युतीचे सरकार हे सर्वसामान्य कामगारांचे सरकार आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल : शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली असून यासंदर्भात शनिवारी आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
जेसीबीतून फुलांचा वर्षाव
- नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचेही नियोजन करण्यात येत असून, नाशिकची विकासकामे करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या दौऱ्याला थोडा विलंब झाला, मात्र सायंकाळी ८ वाजल्यापासूनच शिंदे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी पाथर्डी फाट्यावर गर्दी केली होती.
- यावेळी समर्थकांनी त्यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी केली.
- यावेळी हेमंत गोडसे, सुहास कांदे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ आदी दिग्गज स्थानिक नेते शिंदे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
- त्याचवेळी नाशिकमध्ये एकही शिवसैनिक शिंदे यांना पाठिंबा देणार नसल्याचा दावा उद्धव गटाकडून केला जात आहे.
मात्र, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती मामा ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक व्यासपीठावर उपस्थित होते.
भाजपाच्या नेत्यांनीही स्वागत केले
- मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांसह भाजपाचे काही पदाधिकारीही तेथे उपस्थित होते. या सर्वांचे शिंदे यांनी स्वागत केले.
- यानंतर शिंदे मालेगावला रवाना झाले.
- वाटेत मुंबई नाका तसेच द्वारका चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले.