मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात रात्रीचे खेळ नेहमीच रंगताना दिसतात. नुकत्याच झालेल्या सत्तेच्या महासंघर्षातही रात्रीच्या अंधारात बरंच काही घडलं. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आणि राज्यातल्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. पण त्यात आपली काहीच भूमिका नाही, असंच भाजपा दावा करत राहिली. मात्र, शिवसेना बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पठडीबाहेरचं अनौपचारिक वाटणारं मोकळं-ढोकळं भाषण केलं. त्यावेळी बोलताना रात्रीस झालेला खेळ आणि त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आशीर्वाद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका उलगडली.
रात्रीस चालला खेळ…
- शिंदे यांनी आपल्या बंडाची कहाणी तपशीलवार सभागृहात कथन केली.
- मी आणि देवेंद्र फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते.
- सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगताच देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला. त्यांचा अतिमोकळेपणा पाहूम सगळं उघड करू नका, असं म्हणण्याची वेळ फडणवीसांवर आली.
फडणवीस हेच खरे कलाकार : शिंदे
- शिंदे म्हणाले की भाजपाच्या तुलनेत आमची संख्या कमी आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला आशीर्वाद दिला.
- पंतप्रधान मोदी साहेबांनी शपथ घेण्यापूर्वी मला सांगितले की, ते मला सर्वतोपरी मदत करतील.
- पहाडासारखे आमच्या पाठीशी उभे राहणार, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवत शिंदे म्हणाले, पण ते सर्वात मोठे कलाकार आहेत.