मुक्तपीठ टीम
मुंबईतील वीज खंडित होण्यामागे चीनी हॅकर असल्याच्या महाराष्ट्र सायबर क्राइमच्या दाव्याला भले केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंग यांनी फेटाळले असेल. पण त्यांच्या दाव्याच्या विरोधात आता तेलंगण विद्युत विभागाचे अधिकारीही सरसावलेत. त्यांच्या दाव्यानुसार मुंबईत केला तसाच प्रयत्न चीनी हॅकर्सनी तेलंगणातही केला होता.
तेलंगणामधील सरकारी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत चिनी हॅकर्सनी वीजपुरवठा खंडित केला होता. त्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या शेजारच्या तेलंगणा राज्यातही ब्लॅकआऊट करण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सायबर क्राइमच्या तपासाच्या मुंबईत झालेल्या सायबर हल्ल्याबाबत माहिती दिली होती. राऊत म्हणाले की, फायरवॉल तोडून स्काडा युनिटमध्ये ८ ट्रोजन हॉर्स मालवेअरची प्रवेश घडवला गेला होता.
तेलंगणात दोन सायबर हल्ल्यांचे प्रयत्न
तेलंगणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी हॅकर्सनी तेलंगणातील टीएस ट्रांस्को आणि टीएस गेनको या दोन पॉवर सिस्टिम हॅक करण्याचा प्रयत्न केल्या. या दोन्ही तेलंगणातील प्रमुख वीज वितरण यंत्रणा आहेत. सीईआरटी-इनकडून सूचना मिळाल्यानंतर या केंद्रांनी त्वरित कारवाई केली आणि आयपी सर्व्हरला ब्लॉक केले. रिमोट ऑपरेशनसाठी नियंत्रण कार्य देखील बंद केले.
वीजपुरवठ्यावर अधिक हल्ले
रेकॉर्डेड फ्युचर’ या संस्थेनं केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एनटीपीसी लिमिटेड, पाच विभागीय वितरण सेंटर आणि दोन बंदरांवर या हॅकर्सनी यापूर्वी हल्ला केला होता, अशी माहिती या संस्थेनं दिली आहे. यापूर्वी याच कंपनीनेnu गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या ब्लॅकआउटमागे चिनी हॅकर्सचा सहभाग असल्याचे उघड केले होते. आतापर्यंत चिनी हॅकर्सनी भारताच्या वीजपुरवठ्यात अधिक लक्ष्य केले आहे. देशातील अंतर्गत यंत्रणेला त्रास देणे हा यामागील त्यांचा एकमेव उद्देश आहे.
गलवान हिंसाचारानंतर घटना वाढल्या
रेकॉर्ड फ्यूचरचा असा दावा आहे की, गलवानमधील हिंसाचारानंतर चिनी हॅकर्स सतत भारताच्या अंतर्गत यंत्रणेला हॅक करण्याचा कट रचत आहेत. ते काहींमध्ये यशस्वीही झाले आहेत. यासाठी भारतीय कंपन्यांना सतर्क राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. तथापि, सरकारच्या‘कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया’(सीईआरटी-इन) आणि नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर(एनसीआयआयपीसी) यासारख्या संस्था याकडे बारीक लक्ष ठेवून आहेत.
कोरोना लस बनविणार्या कंपनीवरही हल्ला
दोन दिवसांपूर्वी एका अहवालात असे म्हटले आहे की, चिनी हॅकर्सनी भारतातील कोरोना लस तयार करणार्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांवरही सायबर हल्ले केले आहेत. मात्र, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे कोणतेही आरोप फेटाळून लावणारे निवेदन जारी केले.