मुक्तपीठ टीम
मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईमध्ये वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनी हॅकर्सचा हात असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. त्यावेळी सुमारे १० ते १२ तास वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. गेल्या अनेक दशकांमधील सर्वात वीज पुरवठा खंडित होण्याचा सर्वात मोठा प्रकार म्हणून ज्या घटनेकडे पाहिजे जाते त्या घटनेचा थेट संबंध भारत आणि चीनदरम्यान गलवानच्या खोऱ्यात सुरु असणाऱ्या संघर्षाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने तशा आशयाची बातमी एका सायबर संस्थेच्या हवाल्याने दिली आहे.
भारत आणि चीनच्या जवानांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. त्याच दरम्यान चिनी हॅकर्सच्या टोळ्यांनी ऑक्टोबर महिन्यात पाच दिवस भारतीय यंत्रणांवर सायबर हल्ले केले. यामध्ये पॉवर ग्रीड, आयटी कंपनी, बँकिंग क्षेत्रावर ४० हजार ५०० वेळा सायबर हल्ले केले. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी हॅकर्सनी चिनी मालवेअरने भारतात वीज पुरवठा नियंत्रित करणाऱ्या प्रणालीत घुसखोरी केली. चीनच्या ‘रेड इको’ने भारतातील विद्युत यंत्रणेत मालवेअर प्लांट केला असल्याचा धक्कादायक दावा तपास अहवालात केला आहे.
याआधी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाने मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मालवेअरच्या माध्यमातून झालेल्या सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे लोड डिस्पॅच सेंटरमधील ट्रीपिंगमुळे हा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडल्याचा दावा ऊर्जा खात्याने केला होता. पण आता मुंबईच्या वीज पुरवठा खंडित करण्या मागे चीनी हॅकर्सचा हात असल्याची माहिती अमेरिकन माध्यमांमध्येही आली आहे.
ऑनलाइन धोक्याबाबत विश्लेष्ण करणारी कंपनी रेकॉर्डेड फ्यूचरने चिनी मालवेअरचा शोध घेतला आहे. पण अद्यापही पुरेसा पुराव नसल्याने चीनच्या ‘रेड इको’च्या सायबर घुसखोरीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.