बी. अजय सिंग
दिव्यांग. शरीर धडधाकट नाही. त्यात गावात पाण्याची टंचाई. तरीही भंडाऱ्यातील गोपाळ लिल्हारे या तरुणाने वेगळे प्रयत्न करत मिरचीचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले. अपंगत्वावर मात करत या शेतकरी दिव्यांग तरुणाने बजावलेली कामगिरी कौतुक करावी अशी प्रेरणादायी आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याच्या ठिकाणाहून आठ किलोमीटर अंतरावर सालई बुजरूक असलेले गाव आहे. तेथे राहणारे शेतकरी गोपाळ लिल्हारे यांची ही प्रेरणादायी कामगिरी आहे. खरंतर ते दिव्यांग आहेत. शरीर धडधाकट नाही. गावात पुरेसे पाणीही नाही. तरीही ते स्वस्थ बसत नाही. म्हणतात ना इच्छाशक्ती प्रबळ असल्यावर काहीही अशक्य नाही, त्याचेच एक मोठे उदाहरण आपल्याला त्यांच्यात पाहायला मिळते. पाय ठिक नसूनसुद्धा त्यांनी जिद्दीने व परिश्रमाने एका एकरात मिरची पिकाची लागवड केली वेळोवेळी मशागत व उत्तम संगोपन व्यवस्थित केल्यामुळे त्यातून त्यांना लाखोचे उत्पन्न मिळत आहे.
महाविद्यालयीन अभ्यासक्रमासोबत आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी इतर उद्योग केले आहेत. घरची शेती असली तरी अर्धवट पाण्यामुळे शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी उदरनिर्वाहासाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायही केला.
गोपाल यांना लहानपणापासून शेती कामाची आवड निर्माण झाली वडिलोपार्जित शेत जमिनीत दरवर्षी नवनवीन प्रयोग आपल्या कल्पनेतून करण्याचे धाडस ते दाखवतात, यावर्षी गोपाल यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड केली आणि यासाठी त्यांना जवळपास पस्तीस हजार रुपयाच्या खर्च आला . पिकाची चांगली देखभाल करून मिरची रोपट्यांची पाहिजे त्याप्रमाणे काळजी घेतल्यामुळे उत्पन्न जास्त मिळाले आणि जवळपास तीस ते ३५ क्विंटल उत्पादन होणार असल्याचे शेतकरी गोपाल यांनी सांगितले .
शेतकरी गोपाल यांच्या शेतीतील मिरची पीक आता तोडणीला आले आहे तीस क्विंटल मिरची विक्रीतून जवळपास २ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकरी गोपाल यांना मिळाला आहे . आजच्या ह्या निविन युगात युवा पिढी पारंपरिक शेती व्यवसायाकडे पाठ फिरवत आहे, मात्र काही मोजके सुशिक्षित युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करीत आहेत .
शेतकऱ्यांनी धान पिकांसोबतच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची शेती केल्यास शेती व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. गोपाल लिल्लारे यांच्यासाठी अपंगत्व अडथळा न बनता उत्तुंग झेप घेण्याची कारण ठरले त्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून ज्या प्रक्रारे शेतीतून उत्पंनाच्या माद्यमातून यश संपादन केले आहे खरोखर ते इतरांसमोर प्रेरणादायी ठरत आहे.