मुक्तपीठ टीम
छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य क्रांतीचे तर महात्मा जोतीराव फुले हे समाजक्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण मंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, माजी अध्यक्षा शितल सांगळे, उदय सांगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे, पंचायत समिती सदस्य संगीता पावसे, डॉ. व्ही. एम. अत्रे, राजेंद्र जगझाप, पांडूशेठ केदार, चंद्रकांत वरदळ, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संजय काकड, डॉ. जी. एल. पवार, राजेंद्र जगझाप, सरपंच शिवाजी सोनवणे, उपसरपंच संजय पवार, सदस्य मंगलाताई पवार, माजी सरपंच भाऊसाहेब पवार, निवृत्ती पवार, डॉ.संदीप लोंढे, राजेंद्र भागात आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबतची बाजू केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तोलामोलाचा अन्य कुठलाही नेता केंद्रात नाही. स्वर्गीय मुंडे असते तर आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत मार्ग निघाला असता. त्यामुळे जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र मोजणी व्हावी या मागणीसह केंद्र सरकार घटनादुरुस्तीसह ओबीसी आरक्षण देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणाची लढाई थांबणार नाही. ओबीसी आरक्षणाची लढाई पन्नास वर्षांहूनही आधीपासून सुरू आहे. सन १९३१ च्या दशवार्षिक जनगणनेत ओबीसींचे प्रमाण ५४ टक्के होते. त्यामुळे त्यांच्या ५० टक्के म्हणजे २७ टक्के आरक्षण देण्यात आले असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशातील शेळ्या, बकऱ्या, म्हशी सरकार मोजते. मग ओबीसी माणसे का मोजत नाही असा सवाल स्व. मुंडे करायचे. जनगणनेतून इंपेरीयल डाटा उभा राहिला असून सर्वोच्च न्यायालयात याबाबत लढाई सुरू आहे. भाजपसारखे पक्षही त्यात आता पुढाकार घेत आहेत. देशातील सर्वच पक्षांनी ओबीसी आरक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा असे ते म्हणाले. केवळ राजकारणपूरते आरक्षण मर्यादित नाही तर नोकरीसह इतरही बाबतीत आपल्याला आरक्षण हवे आहे. घटना दुरुस्ती करुन हे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपला हा लढा थांबणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, माझ्या अडचणीच्या काळात धोंडवीर नगर हे गाव माझ्यामागे उभे राहिले. नाशिकमध्ये दहा-बारा लाखांचा मोर्चा निघाला. त्यात या गावांमधील लोकही सहभागी झाले. माझ्या कुटुंबामागे हे गाव उभे राहिले म्हणून या गावाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण आलो असल्याचे ना. भुजबळ म्हणाले. संकट काळात कोण आपला? कोण कामापुरता आलंय ते सर्व समजते असे म्हणत ‘वक्त दिखाई नही देता, लेकिन वक्त बहुत कुछ दिखा देता है’ आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे ते म्हणाल्या की, महात्मा फुले यांचा पुतळा धोंडवीरनगरमध्ये उभारण्यात आला ही आनंदाची बाब आहे. मात्र, अशा राष्ट्रीय नेत्यांचे विचार महत्त्वाचे असून हे स्मारक त्यांच्या विचारांचे स्मारक म्हणून गावाने जपावे. पुतळ्यासह परिसराची स्वच्छता ठेवावी. पुतळ्याचे पावित्र्य जपावे. भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात आपण व्यसनमुक्तीचा नारा दिला असून देशातल्या तरुणांना व्यसनापासून रोखण्यासाठी गावाने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने ओळखला जातो. त्यांच्याच विचारांवर मार्गक्रमण करतो आहे. महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी अनेक वर्षाची मागणी आहे. मात्र, आजपर्यंत हा पुरस्कार मिळू शकलेला नाही. आता माझी दिल्ली दरबारी ऊठबस वाढली आहे. त्यामुळे भारतरत्न मिळवण्यात जास्त वेळ लागणार नाही. भारतरत्नसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.