मुक्तपीठ टीम
लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणी एसआयटीने ५००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये १३ जण आरोपी आहेत. लखीमपूर शेतकरी हत्याकांडप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. खरंतर आठ बळी घेणाऱ्या प्रकरणात मुलगा मुख्य आरोपी असल्याने अजय मिश्रांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी झाली होती. मात्र, पुरावा मिळाला तर पद सोडेन असे सुरुवातीला म्हणत मुलाचा बचाव करणाऱ्या मिश्रांनी गृहराज्यमंत्रीपदी चिकटून राहणे सोडलेले नाही. तसंच भाजपा नेत्यांनीही त्यांना दूर केलेले नाही.
मिश्रांच्या नातेवाईकावर पुराव्यांशी छेडछाडीचा आरोप
- वीरेंद्र शुक्ला हे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे नातेवाईक आहेत.
- लखीमपूर खेरी येथे गेल्या वर्षी झालेल्या शेतकरी हत्याकांड प्रकरणात आशिष मिश्रासह सर्व १३ आरोपी तुरुंगात आहेत.
- हिंसाचाराच्या प्रकरणात एसआयटीने ५००० पानांच्या आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला यांचे नाव जोडले आहे.
- वीरेंद्र शुक्ला घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप आहे.
- हिंसाचाराच्या दिवशी वीरेंद्र शुक्ला यांची स्कॉर्पिओही आशिष मिश्रा यांच्या थारमागे धावत होती.
- वीरेंद्र शुक्ला यांनी स्कॉर्पिओ लपवून ठेवली होती.
- गाडी जागेवर नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५-४५ लाख रुपये आणि सरकारी नोकरीचा निर्णय
- ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.
- या मुद्द्यावरून बराच गदारोळ झाला होता.
- त्यानंतर लखीमपूर खेरी येथे मृत्युमुखी पडलेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५-४५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- किसान युनियन आणि सरकार यांच्यात करार जाहीर झाला.
- आता एसआयटीने लखीमपूर प्रकरणात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
काय झालं होतं लखीमपुरात?
- केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते.
- पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं.
- ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडल्याचा आरोप आहे.
- त्याच्या अमानुषतेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
- सुरुवातीला आपला मुलगा तेथे नव्हताच पासून त्याच्याविरोधात पुरावे नाहीत पर्यंत अजय मिश्रांनी सर्व डावपेच खेळले, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही क्लिन चीट दिली.
- सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी हत्याकांडाची गंभीर दखल घेत चौकशी लावल्याने एसआयटी नेमली गेली आणि अजय मिश्रांचा मुलगा जेरबंद झाला.
संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी लिंक क्लिक करा आणि वाचा:
उत्तरप्रदेशातील शेतकरी हत्याकांड! समजून घ्या शेतकरीविरोधी अमानुषता २० मुद्द्यांमध्ये…