मुक्तपीठ टीम
पंढरपूरच्या विजयानंतर उत्साह वाढलेल्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी आघाडी सरकारवर अधिक आक्रमकतेने हल्ला करण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘धमकी’ हाच शब्द वापरत आघाडीमधील मंत्र्यांविरोधात विचारणा याचिका दाखल करून न्यायालयाला त्यांच्याविरोधातील प्रकरणांना गती देणार असल्याचे उघड केले आहे. या विचारणा याचिका भाजपा म्हणूनच दाखल करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आघाडीतील नेमके कोणते मंत्री किंवा नेते भाजपाच्या विचारणा याचिका हिटलिस्टवर आहे, याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी भुजबळांचा पुतण्या मला त्यांच्या जामिनासाठी वारंवार भेटत असे, असा गौप्यस्फोट केला होता, मात्र, भुजबळांनी तो दावा फेटाळून लावला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
एबीपी माझा या मराठी न्यूजचॅलनचे पत्रकार अभिजित कारंडे अँकरिंग करत असलेल्या लाइव्ह कार्यक्रमात संपादक राजीव खांडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना चंद्रकांत पाटील यांनी पुढील मुद्दे मांडले:
महाविकास आघाडी सरकारच्या ज्या ज्या मंत्र्यांवरच्या केस कोर्टात पेंडिंग आहेत, त्या सर्वांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी ‘विचारणा’ पिटीशन दाखल करणार आहे. जे स्वतः जामिनावर सुटलेले आहेत, अशांनी आदरणीय पंतप्रधानांबद्दल बोलायची हिंमत करू नये.@ChhaganCBhujbal pic.twitter.com/ajheC4G2z1
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 2, 2021
- छगन भुजबळ तुरुंगात होते.
- त्यांचा पुतण्या समीर भुजबळ दिवस दिवस माझ्या बंगल्यावर बसलेला असायचा.
- भुजबळांना जामीन मिळवा. पुन्हा आम्ही राजकारणात दिसणार नाही. आणि आता एवढा तोरा.
- काहीच केले नाही. मोदींवर बोलायला निघाले. अरे तुमचे काय याच्यात. त्या काँग्रेसचे काय. त्या राष्ट्रवादीचे तिकडे तामिळनाडूत की कोठे दोन आले. शिवसेनेचे काय? इथे मुंबईत बसून बार मारायचे.
- जूनमध्ये न्यायालय सुरु झाल्यावर आम्ही भाजपाच्यावतीने विचारणा याचिका दाखल करणार आहोत.
- तीन वर्षांपूर्वी भुजबळांना जामीन झाल्यावर अजून यांच्या तारखा का नाही?
- सामान्य माणसांच्या तारखा पडतात, यांच्या का नाही?
- ते जामिनावर बाहेर, निकाल बाकी, आणि ते मोदींवर बोलणार.
- महाविकास आघाडीच्या ज्या ज्या मंत्र्यांच्या केसेस पेंडिंग आहेत, त्या सर्वांच्याविरुद्ध भाजपा म्हणून विचारणा याचिका दाखल करणार.
…मलाही धमकी देण्याचा अधिकार! – चंद्रकांत पाटील
एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी, “ते जामिनावर बाहेर, याचा अर्थ त्यांचा गुन्हा केला हे साबित थोडं झालेलं आहे? त्यांचा बोलण्याचा अधिकार तुम्ही अशी दमदाटी करुन काढून कसं घेऊ शकता”, असे विचारले असता, चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले, “त्यांना जसा मोदींवर बोलण्याचा अधिकार आहे, तसा मलाही धमकी देण्याचा अधिकार आहे.”
चंद्रकांत पाटील यांची आघाडीच्या मंत्र्यांवर आरोपांची फैर
- “या मंत्रिमंडळात एक एक मंत्री घेऊया.
- जगात जेवढे गुन्हे आहेत. एका एका मंत्र्याला तेवढे चिकटलेले आहेत.
- कुणाला शंभर कोटी चिकटलेले आहेत. कुणाला दोनशे कोटी चिकटलेले आहे.
- कोणावर पोलिसांना मारहाणीचा आरोप आहे.
- कुणाचा जावई ड्रगमध्ये आहे.
- कुणाचा संबंध १५ वर्षांपूर्वी महिलेशी आहे.
- कोण २२ वर्षांच्या मुलीशी संबंध ठेवतो.
अरे राजकारणात नीट बोला.”
भुजबळांनी चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट फेटाळला, आता न्यायपालिकाही?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आज प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी पराभव सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. कारण आता सतत असे पराभवाचे फटके बसणार आहेत. सांभाळून बोलले पाहिजे. मी कालच्या माझ्या प्रतिक्रियेवर ठाम आहे. बंगालच्या पराभवाने नाकच कापून टाकले. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह गेले होते. तरीही ममता जिंकल्या.
त्यांनी काल सांगितले की, भुजबळांचा पुतण्या माझ्याकडे येत होता. सोडवा, सोडवा, सांगत होता. आता मला सांगा माझ्या पुतण्या समीर भुजबळला माझ्याआधी दीड-दोन महिने तुरुंगात टाकले होते. नंतर मला टाकले. पुतण्या कसं जाईल. मुलगा पंकजही समन्स असल्याने दूर दूर राहत होता. मग माझा कोणता पुतण्या त्यांना भेटत होता?
माझ्या केस कोर्टात आहेत. आणि त्यावेळी ते सांगतात महागात पडेल. याचा अर्थ काय काढायचा. आता न्यायपालिकासुद्धा त्यांच्या हातात आहे की काय, असं त्यांना सुचवायचे आहे की काय? ईडी, सीबीआय वाट्टेत ते करायचे. माझ्यावेळीही त्यांनी दोन महिनेआधी सांगितले, भुजबळांना अटक करणार. मग केली. आताही त्यांनी अनिल देशमुखांचे नाव घेतले. मग अनिल परबांचे नाव घेतले. न्यायपालिकाही हातात, असे त्यांना सुचवायचे आहे की काय? आमच्या तारखा सुरुच आहेत. सध्या कोरोनामुळे तारखा नाहीत.
कोण असू शकतं भाजपाच्या हिटलिस्टवर?
चंद्रकांत पाटील यांनी बोलताना आघाडीचे मंत्री असा शब्द वापरला असला तरी त्यांचा रोख हा इतर नेत्यांकडेही असावा, असे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुढील नावे भाजपाच्या हिटलिस्टवर असू शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
- छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा मंत्री
- प्रफुल्ल पटेल, माजी खासदार
- नवाब मलिक, कौशल्य विकास मंत्री
- संजय राऊत, खासदार
- अनिल परब, परिवहन मंत्री
याच जोडीने ज्यांच्याविरोधात भाजपाने १९९९-२०१४ दरम्यान आरोप केले होते, प्रकरणे गाजवली होती असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे तत्कालीन मंत्रीही भाजपाच्या हिटलिस्टमध्ये असू शकतात. त्यातील काहींना खरंतर भाजपाच्या सत्ताकाळात दुर्लक्ष करून अभयच देण्यात आलं होतं.