मुक्तपीठ टीम
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण अखेर संजय राठोडांना बाधले. आता या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. भाजपकडून सातत्याने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपा आता अधिक आक्रमक होत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना थेट डिवचलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया भाजपाची पुढील रणनीती अधिक आक्रमक असेल हे स्पष्ट करणारी आहे. ते म्हणालेत, “जे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवलं आहे… तेच धाडस आता शरद पवार यांनाही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे.” त्याचा अर्थ स्पष्ट आहे, भाजपा आता शिवसेनेच्या एका मंत्र्यांची विकेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्यामागे लागणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता है। संजय राठोडांचा राजीनामा ही जनतेची मागणी आणि भाजप महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम आहे. महाराष्ट्रात कोणत्याही महिलेवर अन्याय होत असेल तर, भाजपा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच संघर्ष करेल. आता सर्व चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे आणि हत्या की कोणाच्या दबावामुळे आत्महत्या हे सर्व जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार ही मागणी केली होती की धनंजय मुंडेच्या मुद्द्यावरही हाच निर्णय घेतला गेला तरच सरकारची थोडीफार इज्जत वाचू शकते. नैतिकतेच्या आधारावर अशा मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर पाऊल उचललंच पाहिजे. उद्धवजी यांना बाळासाहेबांच्या परंपरेनुसार पूजा चव्हाणला आधीच न्याय द्यायला हवा होता.’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.