डॉ.जितेंद्र आव्हाड
भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे थोर उद्गाते ही कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची ओळख. ते कामगार श्रमिकांचे नेते होते. बंदसम्राट वगैरे म्हंटलेले त्यांना आवडले नसते. याचे एक कारण म्हणजे त्यांचा विरोध कारखान्यांना नव्हता; भांडवलशहांना, ते करीत असलेल्या शोषणाला होता. त्यामुळे कारखान्यांत बंद पुकारणे, संप करणे हे लढ्यातील अस्त्र असले तरी ते नाइलाजानेच हाती घेतले जाई. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या समतावादी विचारसरणीत सम्राट हा शब्दच बसला नसता. असे असले तरी या मुंबईच्या गिरणगावची सारी चक्रे एका इशाऱ्यासरशी थांबवण्याची ताकद या लोकनेत्यात होती.
परंतु; एवढीच त्यांची ओळख नव्हती. ते क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यसैनिक होते, लेखक होते, फर्डे वक्ते होते, साहित्य-राज्यशास्त्र-इतिहास-अर्थशास्त्र या विषयांचे व्यासंगी अभ्यासक होते, पत्रकार ही होते.
ते मुळचे नाशिकचे. एकोणिसाव्या शतकाच्या अस्तकालाचा, १० ऑक्टोबर १८९९ चा त्यांचा जन्म. चारचौघांचे असते तशा सामान्य कुटुंबात ते वाढले. नाशिकमध्येच शालेय शिक्षण घेतले आणि १९१७ साली महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते या कामगार-श्रमिक-अभ्यासकांच्या मुंबापुरीत आले. गिरगावातील कामत चाळ हे त्यांचे येथील एक विसाव्याचे ठिकाण होते. कॉंग्रेसचे नेते लोकमान्य टिळक यांच्या जहाल विचारांचा पगडा त्यांच्या मनावर होता. मन बंडखोर होते आणि हवा संघर्षाची होती. महाविद्यालयात त्यांनी ‘द यंग कॉलेजिएट’ नावाचे मासिक सुरू केले. महाविद्यालयाच्या त्या आंग्लाळलेल्या वातावरणात मराठी भाषा साहित्य मंडळ स्थापन करण्यास परवानगी मिळावी यासाठी त्यांनी आंदोलन पुकारले. मुंबईतील पहिला विद्यार्थी संप हाच होता. अखेर महाविद्यालयास मान झुकवावी लागली आणि विल्सन महाविद्यालयात मराठी साहित्य मंडळाची स्थापना झाली.
पुढे १९२० साली लोकमान्यांनंतर देशात गांधीयुग सुरू झाले. तेव्हा कॉ. डांगे महाविद्यालयात BA करीत होते. जागृत विद्यार्थी तोच असतो जो सामाजिक-राजकीय अन्यायाविरोधात उभा राहतो. डांगे यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि परक्यांच्या विरोधातील असहकार आंदोलनात उडी मारली. याच काळात त्यांच्या नजरेसमोर रशियात घडत असलेला एक ऐतिहासिक प्रयोग होता. बोल्शेव्हिकांची राज्यक्रांती – शेतकरी व कामगारांची समतेवर आधारलेली सत्ता त्यांना खुणावत होती. पण त्या काळातील अनेकांप्रमाणे ते स्वप्नाळू तरुण नव्हते. गांधी, मार्क्स व लेनिन यांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास ते करीत होते. त्यातूनच वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी ‘गांधी व्हर्सेस लेनिन’ हे पुस्तक लिहिले. साम्यवादाचा विचार लोकांपर्यंत जावा यासाठी त्यांनी ‘इंदुप्रकाश’या दैनिकात लेखनास सुरुवात केली. त्यानंतर लवकरच त्यांनी स्वत:चे ‘द सोशलिस्ट’ हे इंग्रजी दैनिक सुरू केले. हे देशातील पहिले कम्युनिस्ट नियतकालिक होते. रशियातील क्रांतीचा धसका घेतलेल्या ब्रिटिश साम्राज्याचे पोलिस आणि ‘एमआय-सिक्स’ चे गुप्तचर आता डांगे यांच्यावर नजर ठेवून होते. ३ मार्च १९२४ रोजी त्यांना अन्य काही कॉम्रेडांसह अटक करण्यात आली.
आरोप होता –
ब्रिटिश साम्राज्य उलथवून लावण्याचा कट रचल्याचा.
त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. सुटल्यानंतर त्यांनी पुन:श्च हरीओम करत मुंबईतील गिरणी कामगारांसाठी काम करण्यास सुरू केले. आणि ब्रिटिशधार्जिण्या भांडवलदारांना सळो की पळो करून सोडले. त्यांना पुन्हा २० मार्च १९२९ रोजी मीरत कट प्रकरणात अटक करण्यात आली. आरोप तोच सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्नांचा. या काळात कॉ.डांगे यांचे वास्तव्य एलफिन्स्टन रोडजवळील नागू सयाजीच्या वाडीतील मूलजी हरिदास चाळीच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत होते.१९२८ मध्ये ते गिरगावातील चाळीतून येथे राहण्यासाठी आले होते. त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश मशीनगनधारी पोलिस कॉ.डांगे पळून जाऊ नयेत म्हणून नागू सयाजी वाडीच्या चारही बाजूंना तैनात होते. अटकेनंतर स्वतः पंडित नेहरू परळ नाक्यावरील संघटनेच्या कार्यालयापर्यंत आले होते.
डांगे यांचे जीवन या अशा संघर्षाने भरलेले होते. एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती, कामगारांची स्थिती सुधारण्यासाठीचे लढे चालू होते आणि त्याच वेळी ते देशस्थितीचा अभ्यास करीत होते. इतिहासाच्या अभ्यासातून वर्तमान समजून घेणे आणि त्याचा उपयोग भविष्य घडविण्यासाठी करणे हा त्यामागील हेतू होता.
पुढे ते आयटकचे अध्यक्ष झाले, १९५७ साली कम्युनिस्ट पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे सुद्धा नेतृत्व केले. कम्युनिस्टांच्या फाटाफूटीनंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना त्यांनी केली. कामगारांच्या जागतिक संघटनेचेही ते अध्यक्ष होते. १९७४ साली त्यांचा अमृतमहोत्सव साजरा झाला, तेव्हा सोव्हिएत रशियाने आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांचा गौरव केला. चाळींमधून उभी राहिलेली, चाळकरी कामगारांच्या सुखासमाधानासाठी, समता व स्वातंत्र्यासाठी लढणारी ही उत्तुंग इमारत २२ मे १९९१ रोजी अनंतात विलीन झाली.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: चाळ संस्कृतीत घडलेला साहित्यातील वारणेचा वाघ!