डॉ.जितेंद्र आव्हाड
ही मुंबई यंत्रांची, तंत्रांची, जगणाऱ्यांची,मरणाऱ्यांची,
शेंडीची, दाढीची, हडसनच्या गाडीची,
नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तल्लम साडीची,
बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची,
माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास इथे भलतीच चोरांची,
ऐतखाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची
पर्वा केली नाही उन्हाची,थंडीची,पावसाची
पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची…
‘माझी मैना गावावर राहिली’ या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या राजकीय छक्कडमधील या ओळी एका नजरेत अवघी मुंबई उभ्या करणाऱ्या. येथे पोटासाठी येणाऱ्या कामगारांचे हाल वर्णन करणाऱ्या. लहानपणी अण्णांचे कुटुंब मुंबईत आले, तेव्हाही त्यांचे खिसे पाण्यानेच भरलेले होते. भायखळ्याच्या चांदबीबी चाळीने अण्णाभाऊंच्या कुटुंबाला आसरा दिला. त्या चाळीच्या मालकिणीने भाऊंच्या कुटुंबाला जिन्याखालची एक खोली राहण्यास दिली. तेथे ते एक-दोन वर्षे वास्तव्यास होते.
भायखळा हा गिरणगावचाच भाग. कम्युनिस्टांची कामगार चळवळ तेव्हा तेथे जोशात सुरू होती. त्यांच्या सभा, मोर्चे, आंदोलने हे सारं अण्णा पाहत होते. एकीकडे गिरणीतील नोकरी आणि दुसरीकडे या चळवळीसाठीचे छोटे-मोठे काम सुरू होते. गळ्यात गायकी होती, स्मरणशक्ती पक्की होती आणि प्रतिभा दांडगी. त्यामुळे कम्युनिस्टांच्या वर्तुळात ते लोकप्रिय होत चालले होते. इतके की, आता त्यांचे चळवळीतील मित्रही त्यांना अण्णा या घरगुती नावाने हाक मारू लागले होते. तसे त्यांचे खरे नाव तुकाराम.
भायखळ्यातील चाळीनंतर अण्णांचे कुटुंब चेंबूर आणि पारसी ऑक्ट्रॉय पोस्ट या परिसरात वास्तव्यास आले. तेथे काही काळ राहिल्यानंतर ते माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहायला आले. आणि येथेच खऱ्या अर्थाने अण्णांच्या आयुष्यातील लेखनपर्व सुरू झाले. हा मुळचा लेबर कॅम्प आज जेथे शीवचे लोकमान्य टिळक रुग्णालय आहे तेथे होता. ती वस्ती १९३६ साली उठवून आजचा जो लेबर कॅम्प आहे, तेथे वसवण्यात आला. येथे असतानाच त्यांना ‘कोहिनूर मिल’ मध्ये नोकरी मिळाली. पण चारच महिन्यांत अण्णांची ही नोकरी गेली आणि त्यांना वाटेगावला परतावे लागले. तिकडे आपल्याच एका नातेवाईकाच्या तमाशा फडात ते सामील झाले आणि त्यांच्या अंगातील कलागुणांना, शाहिरीला, लेखनाला तेथे अधिक झळाळी प्राप्त झाली. याच गोष्टींचा वापर करून अण्णांनी तमाशा या कलेला लोकनाट्याचा बाज दिला.
‘चले जाव’ चळवळीतील उपद्व्यापांमुळे अण्णांवर अटक वॉरंट निघाले. त्यांना घर सोडावे लागले. काही दिवस ते डोंगरदऱ्यांत लपून बसले आणि मग मुंबईत आले. येथे आल्यानंतर त्यांनी शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या साथीने ‘लाल बावटा’ कला पथकाची स्थापना केली. ते साल होते १९४४. या कला पथकाने नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जे लोकजागृतीचे काम केले, ते अजोड होते. ‘माझी मैना गावावर राहिली’ ही छक्कड त्या चळवळीतीलच. १९४५ च्या सुमारास अण्णांच्या आयुष्यात काहीसे स्थैर्य आले. चिरागनगरमध्ये ते आता कुटुंबासह राहत होते. कितीतरी काव्यरचना, कितीतरी लोकनाट्ये, कितीतरी कादंबऱ्या अण्णांनी या काळात लिहिल्या. १९५० ते ६२ हा तर त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा सुवर्णकाळ. वारणेच्या खोऱ्यात, फकिरा, वारणेचा वाघ, अग्निदिव्य, टिळा लावते मी रक्ताचा…अशा एकामागोमाग एक कादंबऱ्या गाजत होत्या. अण्णांचे पोवाडे, गीते लोकांच्या ओठांवर खेळू लागली.अफाट लोकप्रियता त्यांना या काळात लाभली. तदनंतर त्यांच्या साहित्याचे जगातील २७ भाषांत अनुवाद झाले. बारा कथांवर चित्रपट निघाले.
फार शिकलेले नव्हते अण्णा; पण जग हीच त्यांची शाळा होती. मुंबई हे त्यांचे विद्यापीठ होते. दलित-शोषित-कामगार यांच्या उद्धारासाठी केवळ भावना असून भागत नसते, त्यास अभ्यासाचीही जोड द्यावी लागते हे सांगणारा कम्युनिस्ट विचार हाही त्यांचा एक मास्तर होता…!!
मुंबईतल्या रस्त्यांवरून, चाळींतून, झोपडपट्ट्यांतून, कारखान्यांतून पाहिलेल्या, अनुभवलेल्या वेदनांनी, अन्यायांनी, संघर्षांनी हा साहित्यातील वारणेचा वाघ घडला होता. एकीकडे तो फॅसिझम च्या विरोधात ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’ गात असतानाच, दुसरीकडे ‘जग बदल घालुनी घाव, सांगूनी गेले भीमराव’ असे सांगत होता. चाळ संस्कृतीतून पारखून निघालेल्या या हिऱ्याला मानाचा सलाम…!
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे: चाळीत मुक्काम, अवघ्या महाराष्ट्राला दिलं आत्मभान