डॉ.जितेंद्र आव्हाड
एके काळी हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘स्वप्नसुंदरी’ चे हृदयचोरणारा तो देशभरातील लाखो तरुणींचा ‘दिल की धड़कन’ बनला नसता, तर नवलच. जितेंद्र तथा रवी कपूर यांना कोणी कसलेला वगैरे अभिनेता म्हणणार नाही; पण राजेश खन्ना, अमिताभ बच्चन असे महानायक या चित्रपटसृष्टीवर राज्य करीत असताना हा ‘जंपिंग जॅक’ चित्रपटसृष्टीच्या धावपट्टीवर खुंटा ठोकून उभा होता, ‘सुपरहिट’ चित्रपट देत होता. तो निर्मात्यांचा लाडका होता. शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला तो भावला तो या शिस्तीसाठीच. जेव्हा तेव्हाच्या हिंदी नायकांची चित्रीकरणाची सकाळची पाळी दुपारनंतर सुरू व्हायची, तेव्हा तो ठरल्याबरहुकूम वेळेवर आपल्या अभिनयाच्या कामावर हजर असायचा. ही कामाप्रतीची श्रद्धा, कामावर वेळेत हजेरी लावण्याची सवय हे मध्यमवर्गीय गुण. ते जितेंद्र यांच्यात आले होते चाळीतल्या
संस्कारातून.
गिरगावातील राजाराम मोहन रॉय रोडवरील ‘श्यामसदन’ ही जितेंद्र यांची चाळ. त्यांचा जन्म अमृतसरचा; मात्र सगळे बालपण गेले मुंबईच्या चाळीत. आजही त्या चाळीतील आठवणी ते विसरलेले नाहीत. ते म्हणतात, ‘हे माझं पहिलं घर माझ्या आठवणींशी जोडलेलं आहे, माझ्या आई-वडिलांच्या स्मृतींशी जोडलेलं आहे. आजही जमेल तेव्हा, गणेशोत्सवाच्या वगैरे निमित्ताने ते त्या चाळीत जात असतात. जितेंद्र यांच्या वडिलांचा कृत्रिम दागिन्यांचा व्यवसाय होता. चित्रपटसृष्टीला ते दागिने पुरवायचे. सुविख्यात चित्रपट निर्माते दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते, तेव्हाची ही गोष्ट. त्या चित्रपटासाठी लागणारे दागिने घेऊन जितेंद्र यांचे वडील स्टुडिओत गेले होते. त्यांच्यासमवेत जितेंद्र हेही होते. व्ही.शांताराम यांनी त्यांना पाहिले आणि चित्रपटाची नायिका संध्या हिच्या ‘डबल’चे म्हणजे एका दृश्यात तिच्याऐवजी उभे राहण्याचे काम त्यांना दिले. त्यांना चित्रपटात नायक म्हणून काम करण्याची संधीही शांताराम यांनीच दिली. साल होते १९६४. चित्रपट – गीत गाया पत्थरों ने. त्यानंतर तीनच वर्षांनी त्यांना ‘फर्ज’ हा चित्रपट मिळाला. त्यातला हा लाल टी-शर्ट, पांढरी घट्ट पँट व पांढऱ्या रंगाचेच बूट घालणारा, उड्या मारत ‘मस्त बहारों का मैं आशिक’ म्हणत नाचणारा सीक्रेट एजंट गोपाल प्रेक्षकांना भावला आणि जितेंद्र यांच्या कारकिर्दीने वेग घेतला. उच्चभ्रू अभिजन त्यांच्या पांढऱ्या पँटीवर पांढरे बूट या फॅशनला हसत, ‘जंपिंग जॅक’ म्हणून हिणवत; सामान्य प्रेक्षकांनी मात्र जितेंद्र यांना कधी नाकारले नाही. २०० हून अधिक चित्रपट आले त्यांचे. त्यातील गाजलेल्या चित्रपटांची संख्या या कलावंताचे चित्रपटसृष्टीतील स्थान सांगून जाते….
जमिनीत मुळे घट्ट खोल असली की, यशाचे डोंगर सहजी पेलता येतात. जितेंद्र हे असेच आपली मुळे न विसरलेले अभिनेते आहेत. हा चाळीतील मध्यमवर्गीय संस्कारांचाच भाग म्हणावा लागेल. काही वर्षांपूर्वी ते आपली कन्या, दूरचित्रवाणी मालिकांची निर्माती एकता कपूर हिच्या एका मालिकेच्या निमित्ताने या चाळीत गेले होते. तेथील एका चाळकऱ्याशी बोलताना ते आपल्या मोडक्या तोडक्या मराठीत म्हणाले होते, ‘बॉडी गेली; पण आत्मा इथेच राहिली!’