डॉ. जितेंद्र आव्हाड
साठचे दशक. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, अशा विविध क्षेत्रांत जगभरात घुसळण सुरू होती. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ म्हणत नव्या रचना केल्या जात होत्या. याच काळात गिरणगावातून मराठीतील प्रस्थापित साहित्यविश्वालाही जोरदार हादरे दिले जात होते. ‘सत्यकथा’ हे मासिक म्हणजे तेव्हाचा प्रस्थापित साहित्यिकांचा बालेकिल्ला मानला जाई. ‘सत्यकथे’त दोन ओळी छापून येणे हे लेखकाच्या मोठेपणाचे प्रमाणपत्र मानले जात असे. या बालेकिल्ल्यावर याच काळात जोरदार भडिमार होऊ लागला होता; त्यात पुढाकार असे लिटल मॅगेझिन चळवळीचा. अशोक शहाणे, भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत पाटील, तुळशी परब, जयंत नेरूरकर, भाऊ समर्थ, गुरुनाथ धुरी, असे अनेक कलंदर हे त्या चळवळीचे बिनीचे शिलेदार. त्यांतील आणखी एक नाव म्हणजे चंद्रकांत खोत.
खोत यांचा जन्म भीमाशंकरचा. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर वडील म्हणाले, ‘आता पुरे. आता कामधंद्याला लागा.’ पण शिक्षणाची आस होती त्यांच्या मनात. स्वकष्टाने ते एमए पर्यंत शिकले. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे पडेल ते काम आणि त्यातून मिळणारा अनुभव यांतून खोत घडत होते. गिरणगावातील वातावरणाचे संस्कार मनाची घडण करीत होतेच. नागपाडा, आग्रीपाडा, महालक्ष्मी, चिंचपोकळी, आर्थर रोड येथून येणारे वेगवेगळे रस्ते भायखळ्यात येऊन मिळतात, तो सात रस्ता हा भाग. ते एका अर्थी त्यांचे विद्यापीठ होते. मॉडर्न मील कम्पाउंड चाळीत ते राहत असत. मुंबईच्या या चाळींतील तरुण-प्रौढांचे जगणे, त्यांचे व्यवहार त्यातही लैंगिक व्यवहार हे सारे ते पाहत होते. कविता, कादंबऱ्यांतून अचाट प्रयोग करित होते. मराठी साहित्याने तोवर सहसा अस्पृश्य मानलेला जिवनभाग म्हणजे लैंगिकता. त्या विषयाला चंद्रकांत खोत यांनी आपल्या कादंबऱ्यांतून हात घातला. १९७० ते ७४ या काळात त्यांनी ‘उभयान्वयी अव्यय’, ‘बिनधास्त’ व ‘विषयांतर’ या तीन कादंबऱ्या लिहिल्या. लैंगिकतेशी निगडित असलेले जीवनप्रश्न मांडणाऱ्या या कादंबऱ्यांनी तेव्हा गहजबच केला. दिलीप चित्रे यांचा ‘केसाळ काळंभोर पिल्लू’, भाऊ पाध्ये यांची ‘वासूनाका’, मनोहर ओक यांची ‘चरसी’, आनंद साधले यांची ‘आनंदध्वजाच्या कथा’….हे सारे समकालीनच. मराठी साहित्यसृष्टीतील अनेक मातब्बर या कादंबऱ्यांवर तुटून पडले. पण, या साहित्यानेच पारंपरिक संकल्पनांना छेद देत मराठी साहित्याचा तुंबलेला बांध फोडला, प्रस्थापित परिमाणे बदलली. ‘मर्तिक’, ‘अपभ्रंश’ हे काव्यसंग्रह, पुरुष वेश्यांच्या जीवनावरील कादंबरी, अशा बिनधास्त लिखाणाप्रमाणेच खोत हे बिनधास्त आयुष्यही जगले. ‘यशोदा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक भाई भगत यांचे सहायक म्हणून चित्रपटसृष्टीतही त्यांनी काही काळ काम केले. पुढे काही वर्षांनंतर त्यांच्या लिखाणाच्या विषयांत ३६० अंशाचा फरक पडला. ते धार्मिक व आध्यात्मिक लेखनाकडे वळले. त्यांना प्रस्थापित साहित्यविश्वाची मान्यता मिळाली ती त्यांनी लिहिलेल्या रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता, साईबाबा यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांवरच्या कादंबऱ्यांमुळे. ‘बिंब प्रतिबिंब’, ‘दोन डोळे शेजारी’, ‘संन्याशाची सावली’, ‘अलख निरंजन’, ‘अनाथांचा नाथ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘हम गया नही जिंदा है’, ‘गण गण गणात बोते’, ‘मेरा नाम शंकर है’, अशा धार्मिक चरित्रात्मक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांची आणखी एक ओळख होती ती दिवाळी अंकाचे संपादक म्हणून.
दिवाळी अंक हे मराठी साहित्यविश्वाचे वैशिष्ट्य. कालांतराने त्यांत एकसाचेपणा येत गेला. तो बांध फोडण्याचे कामही या कलंदर बंडखोराने केले. अ, ब, क, ड, ई या नावाने पाच दिवाळी अंक काढण्याचा त्यांचा संकल्प होता; तो तसाच राहिला. मात्र, नंतर त्यांनी अबकडई या नावाने दिवाळी अंक काढले. एकाच विषयावरचे, सखोल आशयाचे. हे दिवाळी अंकही गाजले. दुर्गाबाई भागवत, भाऊ पाध्ये, वसंत आबाजी डहाके यांच्यासारख्या मराठीतील अनेक नामवंतांना त्यांनी या अंकातून लिहिते केले होते.
आध्यात्मिक व्यक्तिमत्वांच्या चरित्रांनी त्यांना यश मिळवून दिले. मान्यता मिळवून दिली; पण ते त्यात समाधानी नव्हते. या सगळ्या यश, लोकप्रियतेकडे पाठ फिरवली त्यांनी आणि थेट हिमालयात निघून गेले. तेथून परतले ते वेगळे होऊनच. कलंदरपणाच तो. छातीपर्यंत रुळणारी पांढरी दाढी, गोरापान वर्ण, तेजस्वी डोळे, अंगात सॅटिनचा भगवा अंगरखा व त्याच रंगाचा लेहंगा, असा तो सत्तरीतला वृध्द… आता त्यांनी आर्थर रोड येथील साईबाबा मंदिरात आपला मुक्काम हलवला होता. मॉडर्न मिल कम्पाउंडमधले स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते विनय हळदणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार – तेथील तीन नंबरच्या इमारतीतील ३/४४ या घरात त्यांचे वास्तव्य होते. तेथे त्यांचे कुटुंबीय राहायचे; पण आता ते तिकडे केवळ झोपण्यासाठीच जात असत. बाकी सारा वेळ याच मंदिरात असत. तेथेच, वयाच्या ७४ व्या वर्षी १० डिसेंबर २०१४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरणगावातील कामगारांचे जीवनव्यवहार मराठी साहित्यात जोरकस, धाडसाने मांडणाऱ्या या कलंदर लेखकाला आपले २० खंडी आत्मचरित्र लिहायचे होते. त्याचे नावही त्यांनी नक्की केले होते – ‘करून करून भागलो आणि देवपुजेला लागलो’. त्यांचा तो संकल्प अधुराच राहिला.
मॉडर्न मील कम्पाउंडच्या बैठ्या चाळीतील खोली ते हिमालयातील भटकंती ते पुढे सातरस्ता भागातील एका देवळातील वास्तव्य असा प्रवास केलेले गूढ, निर्भीड, बेदरकारपणे ‘सेक्स इज दी फॅक्ट’ असे सांगणारे आणि तेवढेच आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व म्हणजेच चंद्रकांत खोत. या व्यक्तिमत्त्वाला ‘अवलिया’ हा शब्द वापरणे हेच समर्पक ठरेल.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)
विद्रोहाचा दीपस्तंभ बाबुराव बागुल: सर्जनशील साहित्यिक, विद्रोही साहित्य चळवळीचे एक प्रवर्तक