डॉ.जितेंद्र आव्हाड
परिस्थिती कितीही खडतर असो, काळ कितीही प्रतिकूल असो; जिद्द, अभ्यास आणि संघर्षाची तयारी असली, की अडचणी आणि समस्याही शरण येतात, यशाचे आभाळ कवेत येते. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याखेरीज याचे अन्य सर्वोत्तम उदाहरण कोणते असु शकेल?
न्याय, समानता, बंधुता , शांतता यांसारख्या मुलभूत मूल्यांच्या स्थापनेसाठी आयुष्यभर बाबासाहेबांनी लढा दिला. समाजातील शूद्रातिशूद्रांना सन्मानाने जगण्याचे धडे दिले. भारतीय राज्यघटनेसारखी अलौकिक भेट देशाला दिली,असा हा प्रज्ञावंत महामानव. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा मूलमंत्र देणारा असामान्य नेता. त्यांनी दिलेल्या या ध्येयवाक्याचा पहिला यशस्वी महाप्रयोग पहावयास मिळतो तो त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातच. मुंबईतील एका चाळीत राहून ते शिकले. तेथूनच त्यांनी संघटन केले आणि संघर्षाच्या रणभेरी फुंकल्या. तमाम चाळकऱ्यांसाठी केवळ अभिमानाचीच नव्हे, तर आदर्शवत अशी ही गोष्ट. महामानवांना आपल्या अंगाखांद्यावर मिरवण्याचे भाग्य सगळ्याच वास्तुंना लाभत नसते. परळची बीआयटी (बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट) ही चाळ मात्र भाग्यवान. कारण म्हणजे ती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनित झाली आहे. काहीसे असेच भाग्य लाभले होते ते एल्फिन्स्टनच्या डबक चाळीलाही.
१९०१ मध्ये आंबेडकर कुटुंबीय साताऱ्याहून मुंबईत स्थलांतरित झाले, तेव्हा ते अगोदर डबक चाळीत राहात असत. तेथे असतानाच बाबासाहेबांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढे १९१२ साली बाबासाहेब महाविद्यालयात असताना त्यांचे कुटुंबीय परळमधील दामोदर नाट्यगृहानजीक असलेल्या बीआयटी चाळीत राहण्यास आले. बाबासाहेबांचे वडील लष्कारातील निवृत्त सुभेदार होते. ब्रिटिश सरकारने बॉम्बे सिटी ईम्प्रूवमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून परळमध्ये उभारलेल्या बीआयटी चाळीतील खोल्या लष्करातील जवानांना प्राधान्याने देण्यात येत असत. बाबासाहेबांच्या वडिलांनी केलेल्या अर्जानुसार त्यांना चाळ क्रमांक एक मधील ५० आणि ५१ क्रमांकाच्या दोन खोल्या मिळाल्या. तब्बल २२ वर्षे म्हणजे १९१२ ते १९३४ या काळात बाबासाहेब या चाळीत वास्तव्यास होते. येथेच राहून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बि.ए. ची पदवी मिळवली. येथुनच बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. येथे असतानाच ते सिडनहॅम कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. येथे राहात असतानाच त्यांनी सार्वजनिक कार्यास सुरुवात केली. या चाळीतील वास्तव्याच्या काळातच बाबासाहेबांच्या आयुष्यातील महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे करार अशा महत्त्वाच्या, भारतीय इतिहासाला वेगळे वळण लावणाऱ्या घटना घडल्या. याच खोलीत वास्तव्यास असताना बाबासाहेबांनी ‘जनता’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या साप्ताहिकांची सुरुवात केली. तसेच परळमधील या बीआयटी चाळीत आणखी एक ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट.
महाराष्ट्रातील चाळ संस्कृती मध्ये जन्म होऊन पुढील आयुष्यात ती मूल्ये जपत शुद्रातिशुद्रांना सामाजिक लढ्यांच्या माध्यमातून हक्क मिळवून देत भारतीय जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या महामानवांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)