उदयराज वडामकर / कोल्हापूर
गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मारकाची चर्चा सुरू असताना कोरोना परस्थितीत कोल्हापूरकरांना अंधारात ठेवून जयप्रभा स्टुडिओची विक्री झाली आहे. महालक्ष्मी स्टुडिओ फर्मने हा स्टुडिओ विकत घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूरचा जिव्हाळ्याचा विषय असणारा भालजी पेंढारकरांचा कोल्हापुरातील स्टुडिओ वाचवण्यासाठी आता जयप्रभा स्टुडिओच्या दारात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
महालक्ष्मी स्टुडिओ फर्म या भागीदारीत कोल्हापुरातील राजकीय नेत्यांची दोन मुलांचा समावेश आहे. त्यात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या मुलांनी आपल्याला कल्पना न देता व्यवहार केल्याचा दावा केला आहे.
जयप्रभा स्टुडिओची हेरिटेज वास्तू मोकळी जागा व परिसरातील सर्व इमारती आदी महालक्ष्मी स्टुडिओ (एलएलपी ) मध्ये वटमुखत्यारदार सचिव श्रीकांतराव राऊत यांनी विकत घेतले आहेत.
दुय्यम निबंधक यांच्या दप्तरी झालेल्या नोंदणी नुसार लता मंगेशकर यांच्या नावे असलेल्या जयप्रभा स्टुडिओची १२ हजार १२२ चौरस मीटर ही मिळकत आहे . व त्यावरील स्टुडिओचे बांधकाम खुल्या बांधीव मिळकतीच्या खरेदीच्या विक्रीचा व्यवहार १५ फेब्रुवारी २०२० रोजी झाला आहे .
कोल्हापुरात लता मंगेशकर यांच्या मालकीच्या जयप्रभा स्टुडीओ स्मारक करण्याची मागणी जोर धरत असतानाच पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगेशकर कुटुंबीयांनी परवानगी दिली तर आम्ही जयप्रभा स्टुडिओमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक करू असे जाहीर केले. पण या स्टुडिओची मालकी आता मंगेशकर कुटुंबीयांकडे राहिलेली नाही. त्यामुळे आता स्मारक करणार कुठे हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. तसेच तेथे चित्रपट शुटींग कधीतरी सुरु होईल या अपेक्षेत आस लावून बसलेले चित्रपटसृष्टीतील नामवंत निर्माता दिग्दर्शक कलाकार तसेच इतर यांचाही विरस झाला आहे.
महालक्ष्मी स्टुडिओत भागिदार कोण?
महालक्ष्मी स्टुडिओज( एल एल पी) तर्फे वटमुखत्यादार सचिव श्रीकांत राऊत( राहणार जुनी वाशीनाका) हे असून अन्य भागीदार यामध्ये महेश अमृतलाल बाफना- ओसवाल सय्यम नरेन्द्रकुमार शहा. हितेश छगनलाल ओसवाल, पोपटलाल खेमचंद शहा- संघवी, राजू रोकडे पोपटलाल शहा- संघवी, ऋतुराज राजेश क्षीरसागर, पुष्कराज राजेश क्षीरसागर, आदिनाथ शेट्टी यांचा समावेश आहे.