मुक्तपीठ टीम
आला उन्हाळा तब्येत सांभाळा असे नेहमी म्हटलं जातं. सध्या देशात कडक उन्हाळ्याचे चटके बसू लागले आहे. त्याकरता काय करावे याबाबतचे सल्ले केंद्राकडून देण्यात आले आहे. केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहित त्यांना आरोग्यसंबंधित तयारीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. देशभरात वाढणारे तापमान आणि उष्ण वारे यादरम्यान, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य आवश्यक औषधांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी पुनरावलोकन करण्याची आणि संवेदनशील भागात पुरेसा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.
केंद्राकडून राज्यांना पत्र!
- केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सांगितले की, हवामान खात्याने मध्य, पश्चिम आणि उत्तर भारतासाठी सामान्यपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला आहे, जेथे पारा आधीच अनेक ठिकाणी ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे, जो सामान्यपेक्षा ६ अंश सेल्सिअस जास्त आहे.
- उष्माघाताच्या प्रकरणांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सर्व जिल्ह्यांना ‘उष्मा रोगांवरील राष्ट्रीय कृती योजना’ वरील मार्गदर्शक दस्तऐवज पाठवण्याचे आवाहन केले.
सोलार पॅनेल वापरण्याचा सल्ला!
राजेश भूषण यांनी पत्रात कूलिंग उपकरणांसाठी अखंड वीजपुरवठा करण्याचे आवाहन केले आहे. देशभरात वीज टंचाई असताना, “शक्य असेल तेथे” सोलर पॅनेलचा वापर सुचवण्यात आला आहे.
दारू पिण्यास मनाई
आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधे आणि IV द्रवपदार्थ, ORS, बर्फाचे पॅक आणि थंड पेय पाणी यासारख्या उपभोग्य वस्तूंसह तयार राहण्यास सांगून केंद्राने उष्णतेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची यादी जारी केली आहे.
घराबाहेर पडताना टोपी आणि छत्रीचा वापर करणे!
दिवसाच्या उष्ण भागांमध्ये लोकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला देत, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की लोकांनी छत्री किंवा टोपी घेऊन बाहेर पडावं. तहान नसतानाही लोकांनी चांगले हायड्रेटेड राहावे आणि नियमितपणे पाणी प्यावे. अल्कोहोल, गरम पेय सेवन करू नये.
केंद्राकडून हेल्पलाईन नंबर जारी…
जर त्यांना उष्णतेशी संबंधित लक्षणे जसे की शरीराचे उच्च तापमान, चक्कर किंवा श्वास घेण्यास त्रास किंवा घाम न येणे होत असेल तर १०८/१०२ हेल्पलाइन नंबरशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. शरीराचे तापमान ४० सेल्सिअसपेक्षा जास्त, स्नायू कमकुवत, मळमळ आणि उलट्या, जलद हृदयाचे ठोके आणि खोल श्वासोच्छ्वास ही वैद्यकीय आणीबाणी म्हणून ओळखली गेली आहे. अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला गेला आहे.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की १ मार्चपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (आयडीएसपी) अंतर्गत उष्णतेशी संबंधित रोगांचे दैनंदिन निरीक्षण केले जात आहे. “कृपया हे दैनंदिन निरीक्षण अहवाल नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) सोबत शेअर केले आहेत याची खात्री करा,” असे त्यात म्हटले आहे.