मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण ३० जुलै रोजी महाराष्ट्रात आढळला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालूक्यातील बेलसर गावात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. ती रुग्ण महिला आता बरी झाली असली तरी त्याची गंभीरतेने दखल घेत महाराष्ट्राच्या आरोग्यविषय शीघ्र कृती दलाच्या पथकाने या गावाला भेट दिली. आवश्यक उपाययोजनेला सुरुवात केली. केंद्र सरकारकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. झिका विषाणू आढळलेल्या बेलसर या गावाची तपासणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक येणार आहे.
केंद्राचं पथक आज महाराष्ट्रात
- केंद्रीय पथकात तीन तज्ज्ञांचा समावेश
- हे पथक बेलसर गावाची पाहणी करणार आहे.
- कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथकं सर्वेक्षण करण्यासाठी पाठवलं आहे.
- दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालय स्त्रीरोगतज्ज्ञ, आणि राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे.
- बेलसर गावाची पाहणी करुन हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण आहे.
बेलसर हे पुरंदर तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव असून या ठिकाणी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ताप रुग्ण आढळून येत होते. त्यातील पाच रुग्णांचे नमुने दिनांक १६ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे तपासण्यासाठी पाठविले असता त्यापैकी तीन जणांना चिकनगुनिया आजाराचे निदान झाले. दिनांक २७ ते २९ जुलै २०२१ या कालावधीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या डेंग्य़ू चिकनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ चमूने बेलसर आणि परिंचे या भागात भेट देऊन सुमारे ४१ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित केले. त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया तर ३ जणांना डेंग्यू आजार असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरून स्पष्ट झाले असून बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस विषाणु आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष दिनांक ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे.
राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाची बेलसर गावास भेट
३१ जुलै २०२१ रोजी डॉ.प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, डॉ. कमलापुरकर, सहाय्यक संचालक, हत्तीरोग आणि डॉ.महेंद्र जगताप, राज्य कीटकशास्त्रज्ञ या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथील कर्मचारी वृंद आणि पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने करावयाच्या कार्यवाही बाबत अवगत केले.
झिका रुग्ण बरी!
बेलसर गावातील सदर झिका रुग्ण सध्या पूर्णपणे बरी झाली असून या महिलेस कोणतीही लक्षणे नाहीत तसेच तिच्या घरांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत.
झिका रोखण्यासाठी कार्यवाही
- झिका रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर बेलसर गाव आणि परिसरात राज्य शीघ्र प्रतिसाद पथकाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे.
- बाधित रुग्ण आणि गर्भवती महिलांना मच्छरदाणी वाटप करण्याबाबत ग्रामपंचायत बेलसर योग्य ती कार्यवाही तातडीने करत आहे.
- गरोदर मातांची यादी करुन त्यांचे विशेष सर्वेक्षण करणे, भागातील मायक्रोसिफाली, गर्भपात आणि जन्मतः होणा-या मृत्यूंचे सर्वेक्षण करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे.
- गावात स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे.
ताप रुग्ण सर्वेक्षण
- झिका रुग्णाच्या पाच किलोमीटर त्रिज्येच्या अवकाशात येणाऱ्या आजूबाजूच्या एकूण सात गावांमध्ये घरोघरी भेटी देण्यात येत आहे.
- ताप रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.
- त्या संदर्भातील सूक्ष्म नियोजन करून येत्या तीन दिवसात या सर्व गावांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
कीटक शास्त्रीय सर्वेक्षण
- झिका हा आजार डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराप्रमाणे एडीस इजिप्ती या डासांमुळे पसरतो.
- याकरता बाधित क्षेत्रांमध्ये डास अळी घनता सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आले आहे.
- कीटकशास्त्र सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
- कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात लोकसहभाग घेण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहेत.
एकात्मिक कीटक व्यवस्थापन
- बाधित भागातील डासोत्पत्ती नियंत्रणात आणण्यासाठी पुढील कृती योजना सुरु करण्यात आल्या आहेत:
- पाण्याची डबकी बुजवणे
- वाहती करणे
- योग्य ठिकाणी गप्पी मासे सोडणे
- तसेच घरगुती साठवलेल्या पाण्यामध्ये अळीनाशकाचा वापर करणे
- बाधित भागात धुरळणी करणे
बेलसर गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करणे
- सध्या या गावात तीन दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येते.
- त्यामुळे पाणी साठवण्याची गरज पडल्याने डासोत्पत्तीस हातभार लागला आहे. अनेक घरांसमोर जमीनीखालील पाण्याच्या टाक्या आहेत.
- या करिता गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्य शिक्षण
- कीटकजन्य आजार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध माध्यमातून जनतेचे प्रबोधन करण्यात येते आहे.
- झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोविड सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही.
- याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना अवगत करण्यात आले आहे.