मुक्तपीठ टीम
पुणे, पनवेल, औरंगाबाद आणि परभणी येथे वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी कठोर निर्बंध घातल्यानंतर आता इतरही शहरांमध्ये अशीच घोषणा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरचा इशारा हे शब्द वापरत पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. लॉकडाऊनमुळे अर्थकारण पूर्णच थंडावत असल्याने कुणीही मनापासून लॉकडाऊनच्या बाजूने बोलत नाही. पण संसर्गामुळे शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळेच आता लॉकडाऊन खरंच आवश्यक आहे का, असा मुद्दा चर्चेत आला आहे. केंद्रातून आलेल्या पथकानेही लॉकडाऊनपेक्षा इतर उपाय सुचवल्याचे सांगितले जाते.
अनेक महानगरांमध्ये, छोट्या शहरांमध्ये हॉटस्पॉट्समधील रेस्टॉरंट्स, बार, बॅनक्वेट हॉल आणि दुकानांच्या वेळांवर निर्बंध घातले जात आहेत. मात्र, राज्य आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांच्या मते कोरोना संसर्गाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या मते मात्र, आता कोरोनाला अठकाव करण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही, त्यापेक्षा दक्षता आणि कडक प्रतिबंध वाढवणे आवश्यक आहे.
केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांच्या मते, महामारीच्या सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन आवश्यक होते, जेव्हा आपल्याला पायाभूत सुविधा उभाराव्या लागतात. परंतु या टप्प्यावर त्याची आवश्यकता नाही.
पक्षकाने मोठ्या प्रमाणावर चाचणी, कोरोना संसर्ग जास्त असलेल्या क्लस्टर्सची काटेकोर निगराणी व सर्व मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी असे उपाय सुचविले आहे. गेल्या आठवड्यात पुणे जिल्हा आढावा बैठकीत या सूचनांचा एक अहवाल तयार करण्यात आला व त्यावर चर्चा करण्यात आली.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि अकोला, अमरावती, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.
केंद्रीय कार्य पथकाच्या सूचनांनुसार बाधित जिल्ह्यांनी ऑगस्ट ते सप्टेंबरच्या संसर्ग काळातील कडक उपाययोजना पुन्हा राबविली पाहिजे. जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि घरोघरी स्वॅब कलेक्शनवर लक्ष केंद्रित करून घराघरांत जावून पाहणी करणे आवश्यक आहे.