मुक्तपीठ टीम
विविध प्रकारच्या भंगाराच्या विल्हेवाटेतून मध्य रेल्वेला ४ जानेवारीपर्यंत, तब्बल ३५० कोटी ८१ लाख रुपये कमाई झाली आहे. भुसावळ विभागाने आजवरच्या सर्वाधिक एक दिवसीय भंगार विक्रीतून तब्बल १५ कोटी ५३ लाख रुपये जमा केले. शिवाय १६६ लाख रुपयांचे एकूण विक्री मूल्य असलेले भंगार स्पर्धात्मक दराने ई-लिलावाद्वारे विकले गेले आहे.
‘भंगाराच्या विक्रीमुळे केवळ महसूल मिळत नाही तर परिसराची देख•ाालही चांगली होते. मध्य रेल्वे ‘मिशन मोड’मध्ये ओळखल्या गेलेल्या सर्व भंगार साहित्याची रेल्वेमधील विविध ठिकाणी विक्री करेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले.
रेल्वेचा प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार विविध साहित्यांपासून ‘शुन्य मुक्त’ होण्याची मोहिम मध्य रेल्वेने सुरु केली. या मिशनचा पाठपुरावा करून, भुसावळ विभागाने ३ जानेवारी २२ रोजी आयोजिलेल्या लिलावात १५ कोटी ३३ लाख रुपये ‘कमावले’.
म. रेल्वेने तब्बल ३५ हजार ११९ मेट्रिक टन स्क्रॅप रेल/कायम मार्ग, ३५८ नग लोको, डबे आणि वॅगन्स व्यतिरिक्त इतर फेरस आणि नॉन-फेरस भंगार वस्तूंची विल्हेवाट लावली.
भंगाराची जलद विल्हेवाट लावण्यासाठी आणि रेल्वे बोर्डाने दिलेले ‘लक्ष्य’ पार करण्यासाठी आणि ‘झिरो स्क्रॅप मिशन’ साधण्यासाठी, अतिरिक्त भंगार ओळखण्यासाठी आणि एकत्रित करण्यासाठी सर्व प्रयत्न मध्य रेल्वे करत आहे. त्याकरीता विद्यमान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे, असेही सांगण्यात आले.