मुक्तपीठ टीम
लसीकरणाच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकार पुन्हा शब्द बदलताना दिसत आहे. यावर्षीच्या मे महिन्यात मोदी सरकारने ऑगस्ट ते डिसेंबर यादरम्यान सुमारे २१६ कोटी लस उपलब्ध होणार असल्याचा दावा केला होता. आता मात्र, मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात या कालावधीत फक्त १३५ कोटी लस उपलब्ध असतील, असे सांगितले आहे. लसींचा हा आकडा आधी सांगितलेल्या आकड्यापेक्षा ८१ कोटीने कमी आहे.
केंद्र सरकारने शनिवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यानुसार, कोरोनाचे एकूण १३५ कोटी डोस ऑगस्ट २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध असतील. यात कोव्हिशिल्डचे, ५० कोटी, कोव्हॅक्सीनचे ४० कोटी, बायो-ई सब युनिट लसीचे ३० कोटी, झाइडस कॅडिला लसीचे ५ कोटी आणि स्पुतनिक व्हीचे १० कोटी डोस असतील. एक प्रकारे हे सरकारचे यू-टर्न म्हणून मानले जात आहे. कारण मे महिन्यात केंद्र सरकारने ऑगस्ट ते डिसेंबर या काळात भारतात २१६ कोटी कोरोना लस तयार करण्याची घोषणा केली.
• उन्हाळ्यात मोठा आकडा
मे महिन्यात दिले होते २१६ कोटी डोसचे आश्वासन
• केंद्र सरकारने भारतात २१६ कोटी कोरोना लस उपलब्ध करण्याची घोषणा केली होती.
• नीती आयोगाच्या आरोग्य समितीचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले होते की, “ऑगस्ट ते डिसेंबर या काळात देशात २१६ कोटी कोरोना लस तयार केल्या जातील. या लसी पूर्णपणे भारत आणि भारतीयांसाठीच बनवल्या जातील. ते म्हणाले होते की येत्या काळात प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होईल यात शंका नाही.”
• पावसाळ्यात आकडा घटला
जूनमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत १३५ कोटी डोसींचा दावा
• कोरोना लसीचे एकूण ५१.६ कोटी डोस ३१ जुलैपर्यंत उपलब्ध होणार.
• ५१.६ कोटी डोसपैकी ३५.६ कोटी डोस आधीच दिले गेले आहेत.
• एकूण १३५ कोटी डोस ऑगस्ट २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध असतील.
• यात कोव्हिशिल्डचे, ५० कोटी, कोव्हॅक्सीनचे ४० कोटी, बायो-ई सब युनिट लसीचे ३० कोटी, झाइडस कॅडिला लसीचे ५ कोटी आणि स्पुतनिक व्हीचे १० कोटी डोस असतील.
• एक प्रकारे हे सरकारचे यू-टर्न म्हणून मानले जात आहे.
मुलांसाठी लस कधी?
• भारताच्या औषध नियामकानं १२ मे रोजी भारत बायोटेकला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीच्या क्लिनिकल चाचण्या घेण्यास परवानगी दिली होती.
• चाचणीसाठी नोंदणी सुरू झाली आहे.
१२ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी क्लिनिकल चाचण्या पूर्ण
• डीएनए लस विकसित करणार्या झाइडस कॅडिलाने १२ ते १८ वयोगटातील क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
• मान्यता मिळाल्यानंतर ही लस १२ ते १८ वयोगटातील मुलांना उपलब्ध होईल.
• प्रतिज्ञापत्रात सरकारने असेही म्हटले आहे की, ही लस देशातील पात्र जनतेला लसी देण्यासाठी उपलब्ध असेल.