मुक्तपीठ टीम
नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘झुंड’ चित्रपट सध्या चर्चेमध्ये आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट शुक्रवारी ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. झुंड चित्रपट पाहून अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांनी नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे. अनेक दिग्दर्शकांनी हा चित्रपट ऑस्करसाठी जायला पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे.
अभिनेता आमिर खान
झुंड चित्रपट पाहिल्यानंतर आमिर म्हणाला, ‘हा चित्रपट यूनिक आहे. सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. मी २०-३० वर्षात जे काही शिकलो त्या सर्व गोष्टींचा यांनी फूटबॉल केलाय, असं म्हणता येईल. ‘ या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाबद्दल आमिर म्हणाला, ‘अमिताभ बच्चन यांनी अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे पण हा त्यांच्या सर्वात चांगल्या चित्रपटांमधील एक चित्रपट आहे. तसेच या चित्रपटात लहान मुलांनी देखील चांगलं काम केलं आहे. ‘ चित्रपट पाहिल्यानंतर आमिर या चित्रपटातील कलाकारांना भेटला.
अभिनेता धनुष
झुंड पाहिल्यानंतर धनुष म्हणला, ‘मला कळत नाहिये मी काय बोलू, खूप छान चित्रपट आहे. या चित्रपटातील संदेश हा सर्वांनी ऐकला पाहिजे. मी या चित्रपटातील हजारपेक्षा जास्त चांगल्या टेक्निकल गोष्टी सांगू शकतो. चित्रपट पाहण्याचा अनुभव प्रत्येकानं घ्यावा. हा मास्टरपीस आहे. हा चित्रपट अनेकांचे लक्ष वेधणार आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मला आनंद झाला. चित्रपटात काम केलेल्या मुलांनी माझे मन जिंकल आहे. अमिताभ बच्चन तुम्ही खूपच छान काम केले आहे. पूर्ण टीमनं चांगले काम केले आहे. नागराजचे मी आभार मानतो त्याने एवढा चांगला चित्रपट तयार केला. मी सर्व टीमला शुभेच्छा देतो.’
अभिनेता सिद्धार्थ जाधव
तुम्ही आमचं अस्तित्व नाकारूच शकत नाही..” नागराज मंजुळे भावा, अप्रतिम हा शब्द फक्त नावाला आहे. त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर ‘झुंड’ पहायलाच हवा. स्वप्न प्रत्येकाची असतात. पण ती पूर्ण करण्याची धमक ‘झुंड’मध्ये होती, आहे, आणि कायम राहणार हे तू पुन्हा एकदा सिध्द केलंस. अभिमान वाटतो तुझा. “अपून की बस्ती गटर मे है… पर तुम्हारे मन मे गंद है”, या ओळी मनातून जातच नाहीत. अजय अतुल दादा… आय लव्ह यू फॉरेव्हर. कलाकारांच्या कामाबद्दल मी काय बोलणार? “बच्चों से लेकर बच्चन तक”, सगळेच वरचा क्लास. जे जगणं आहे तेच नागराज ने खरंखरं मांडलंय. माणसाच्या माणुसकीचा प्रवास.. झुंड… नक्की बघा नाही, पहायलाच हवा, असं सिद्धार्थने म्हटलंय.
“तुम्ही आमचं अस्तित्व नाकारूच शकत नाही.”
नागराज मंजुळे भावा…”अप्रतिम” हा शब्द फक्त नावाला आहे.. त्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर “झुंड” पाहयलाच हवा.
जे “जगणं” आहे तेच नागराज ने “खरंखरं” मांडलय….
“माणसाच्या माणूसकीचा प्रवास…”झुंड”
@Nagrajmanjule @AjayAtulOnline pic.twitter.com/nVfGtlSGki— SIDDHARTH JADHAV 🇮🇳 (@SIDDHARTH23OCT) March 3, 2022
अभिनेता जितेंद्र जोशी
मराठीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी यानंही नागराज मंजुळेच्या या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत जितेंद्र जोशी याने या चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी जितेंद्र जोशी म्हणाला,आज नागराज मंजुळे विषयी आणि झुंडविषयी तुम्हा सर्वांसोबत बोलायचे आहे. आमचा नागराज हिंदी चित्रपटात येतोय. यात सर्वात आधी हिंदी चित्रपटाचे अभिनंदन.
काही दिवसांपूर्वी मी पडलो आणि मला लागलं आणि आज मी लाईव्ह येण्यासाठी चष्मा शोधत होतो. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा माझाच चेहरा आहे. हा सध्या विद्रुप दिसतो आहे. इथे जरी मी चेहरा लपवला तरी पण आरशात माझा चेहरा मला बघावा लागतोच. तसेच माझ्या चेहऱ्यावर जखम आहे हे मला माहिती आहे. झुंड हा चित्रपट अगदी तसाच आहे.
झुंड हा तो चेहरा आहे. अजिबात न लपवलेला…मेकअप नसलेला. हा खरंच एक उत्कृष्ट चित्रपट आहे. मी तीन दिवसांपूर्वी हा चित्रपट पाहिला. मला त्यांच्या संपूर्ण टीमला भेटायचे आहे. या चित्रपटात ज्या अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे, तसा बच्चन मी यापूर्वी पाहिला नाही. यात सर्व नवीन मुलं आहेत पण यात सर्वांनी फार छान काम केली आहेत. सर्वांनी आपापल्या मुलांना हा चित्रपट दाखवा. झुंड पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की त्या माणसाने अमिताभ बच्चनला त्याने काहीही अमिताभ बच्चनगिरी करुन दिलेली नाही. फारच मस्त चित्रपट बनवला आहे. म्हणून मग मी विचार केला की लाईव्ह जाऊ आणि सांगू सर्वांना हा चेहरा म्हणजे झुंड आहे. झुंड पाहताना चित्रपटगृहात अक्षरश: रडू येतं
अमिताभ बच्चन यांना अशा रुपात बघण्याची सवय नाही. महानायकाला आणि महामानवाला एकाच फ्रेममध्ये आणलं आहेस. हे तूच करू शकतोस. तू यापुढे दोन किंवा चार जितके चित्रपट बनवं, पण आम्हाला हेच सांग. कारण हे सांगणारा दुसरा कोणीही माणूस नाही”, असेही जितेंद्र जोशी म्हणाला.
अभिनेता किरण माने
किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाचा एक पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरसोबत त्यांनी लिहिले की, ‘झुंड नादखुळा, भन्नाट, जबराटच असनार, देशभर धुमाकुळ घालनार यात वादच नाय. नागराज, आमच्या शुभेच्छा कायम तुझ्यासोबतच हायेत’.
दोन पिच्चरमध्ये मराठी सिनेमाला कुठल्या कुठं नेलंस तू भावा! तुझा आदर्श घेऊन महाराष्ट्रातल्या गांवखेड्यातून हजारो नागराज उभे रहावेत… सर्वसामान्यांचं खरंखुरं जगनं-त्यांच्या वेदना-त्यांचा आनंद-त्यांच्या आशाआकांक्षा मोठ्या पडद्यावर याव्यात.. विकृत टोळींनी कब्जा केलेल्या मराठीतल्या दलदलीबाहेर निर्मळ मनाच्या प्रतिभावान कलाकारांची मराठी इंडस्ट्री उभी रहावी ही मनापासून इच्छा ! लब्यू नागराज
दिग्दर्शक केदार शिंदे
- केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे जरा वेगळ्या शब्दात कौतुक केलं आहे.
- केदार शिंदे यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. म्हणून ‘झुंड’ हा चित्रपट पाहा.
जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. #झुंडसिनेमाम्हणूनपाहा
— Kedar Shinde (@mekedarshinde) March 5, 2022
अभिनेता वैभव मांगले
‘मी कालच एक गोष्ट बोललो… कुणाला पटेल न पटेल… घाई करतोय असं वाटेल…. पण नागराज ऑस्कर आणेल, याची पूर्ण खात्री आहे. कारण ज्या कलेत मातीच सत्व असतं ती मोठी कला. नागराजकडे ते आहे. झुंडसाठी खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा!!’