मुक्तपीठ टीम
औद्योगिक क्षेत्रात घडणाऱ्या छोट्या – मोठ्या अपघातांना प्रतिबंध बसावा यासाठी नागरी संरक्षण दल व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या संयुक्त विद्यमानाने औद्योगिक कामगारांसाठी तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. ठाणे व बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील उद्योग क्षेत्रातील कामगार तसेच कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
‘राज्य मिशन २०२२ -२०२३’ अंतर्गत संचालक, नागरी संरक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण रबाळे अग्निशमन केंद्र येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे ३ ते ५ ऑगस्ट २०२२ दरम्यान प्रशिक्षण पार पडले.
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यवर्षात औद्योगिक जडणघडणीमध्ये व प्रतिबंधक उपाययोजनाद्वारे प्रशिक्षीत कामगार वर्ग तयार करण्याकरिता नागरी संरक्षण दलाच्या वतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. सामान्य नागरिकांबरोबरच, सर्व उद्योगधंदे व कारखान्यामधील कामगार कर्मचारी यांना आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण घेता यावे व सर्व कर्मचारी प्रशिक्षीत व्हावेत, याकरीता नागरी संरक्षण दल प्रयत्नशील आहे. या प्रशिक्षणात प्रामुख्याने आग प्रतिबंध व सुरक्षा उपाययोजना, प्रथमोपचार व सीपीआर, विमोचन या विषयावर व्याख्याने व प्रात्यक्षिके पार पडली.
“राज्य मिशन २०२२-२०२३ अंतर्गत नागरी संरक्षण विभागातर्फे सुरक्षा उपाययोजनाकरिता जास्तीत जास्त औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी नागरी संरक्षण संचालनालय तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.